वयस्क मतदारांसाेबत त्यांच्या सहायकांना मतदान केंद्रात प्रवेश नाही
By शिरीष शिंदे | Published: May 4, 2024 06:20 PM2024-05-04T18:20:46+5:302024-05-04T18:21:12+5:30
लोकसभा मतदानाच्या संदर्भाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली माहिती
बीड : वयस्क मतदारांसोबत त्यांच्या सहायकांना मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त असणार आहे. त्यामुळे याबाबतची तक्रार आल्यास तत्काळ संबंधितावर कारवाई केली जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी मुधोळ पुढे म्हणाल्या की, मतदार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या २१ लाख ४२ हजार ५४७ एवढी आहे. त्यामध्ये ११ लाख ३४ हजार २८४ पुरुष तर महिला मतदार संख्या १० लाख ८ हजार २३४ तर तृतीयपंथी मतदार २९ आहेत. छाननी अंती ४१ उमेदवार राहिले आहेत. बॅलेट पेपरवर ४१ उमेदवार व एक नोटा अशी एकूण ४२ ची यादी असेल.