जिल्हा बँकेत आता ८ जागांसाठी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:00 AM2021-03-13T05:00:10+5:302021-03-13T05:00:10+5:30

बीड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उपविधी मधील सेवा सोसायटीच्या ऑडिट दर्जाबाबतच्या नियमामुळे सेवा संस्था मतदारसंघातून सर्वच उमेदवारांचे ...

Election for 8 seats in District Bank now | जिल्हा बँकेत आता ८ जागांसाठी निवडणूक

जिल्हा बँकेत आता ८ जागांसाठी निवडणूक

Next

बीड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उपविधी मधील सेवा सोसायटीच्या ऑडिट दर्जाबाबतच्या नियमामुळे सेवा संस्था मतदारसंघातून सर्वच उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. याप्रकरणी सहकार मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिल्याने या मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या संबंधित उमेदवारांना दिलासा मिळू शकला नाही. परिणामी आता केवळ ८ जागांसाठीच जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच भाजपच्या गटाला फटका बसला आहे. जिल्हा बँकेच्या १९ संचालकांच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्जांच्या छाननी दरम्यान १२१ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. यात सेवा सोसायटी मतदारसंघातून लढणाऱ्या सर्वच ६६ जणांचे अर्ज बाद ठरविण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध या उमेदवारांनी विभागीय सह निबंधकांकडे दाद मागितली होती. मात्र तेथेही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे या उमेदवारांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

अपिलकर्ते धनराज मुंडे यांच्या याचिकेवर तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या नियमांना स्थगिती दिली होती. त्या अपिलावरून विद्यमान सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली असता त्यांनी अंतरिम स्थगिती देण्यास नकार देऊन निर्णय दिला. या निर्णयाविरोधात धनराज मुंडे यांच्यासह अन्य पाच ते सहा उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यात विद्यमान सहकार मंत्र्यांच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आता केवळ उर्वरित ८ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

निवडणूक झाली तरी पेच

सहकार प्राधिकरणाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. १९ पैकी ११ संचालक सेवा सोसायटी मतदारसंघातून निवडले जातात. मात्र यातील सर्वच उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहे. त्यामुळे उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांसाठी निवडणूक होईल. मात्र त्यानंतर संचालक गणपूर्तीचा पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत येत्या महिनाभरात बँकेवर प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मतदान केंद्र निश्चित

दरम्यान जिल्हा बँकेतील आठ जागांसाठी २० मार्च रोजी मतदान होणार असून मतमोजणी व निकाल २१ मार्च रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी ११ मतदान केंद्र व जागा निश्चित करण्यात आल्या असून बीड जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मतमोजणी होणार आहे.

Web Title: Election for 8 seats in District Bank now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.