बीड : जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. एक नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, बुधवारी नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा नारळ फुटला. वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या ठिकाणी उमेदवारांसह पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गल्लीबोळात प्रचार सभा वडवणी : शहरातील पहिल्यांदाच होत असलेल्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी माजली असून दोन दिवसांत खासदार, आमदार, माजी मंत्नी, विरोधी पक्षनेते यांच्यासह इतर अनेक पक्षश्रेष्ठी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. नगरपंचायत निवडणुकीत १000५ मतदार असून १७ जागेसाठी ७0 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. शहरातून प्रचार करताना मुख्य रस्त्यांवरील धूळ मोठय़ा प्रमाणावर उडत असून काही पदाधिकारी गाडीतूनच प्रचार करण्यास ध्यनता मानतात. शहरातील मुख्य प्रश्न मतदार उपस्थित करत आहेत. यावर उमेदवारांकडून दुष्काळातही आश्वासनांचा पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. बुधवारी सकाळपासून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे पक्षाच्या उमेदवाराने प्रभागातील डोअर टू डोअर प्रचार केला. शहरातील जोडअंबातांडा, मुस्लिम मोहल्ला, वडरवाडा, बसस्थानक परिसरात भाजपचे युवा नेते बाबरी मुंडे यांनी कॉर्नर बैठक घेऊन प्रचारात युवाशक्ती सक्रिय सहभाग नोंदविला. १७ जागांसाठी ६0 उमेदवार शिरूर कासार : नगरपंचायतीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर १७ जागांसाठी ६0 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काही वार्डात सरळ तर काही वार्डात तीन, चार आणि दोन वार्डात प्रत्येकी ७ उमेदवार उभे राहिल्याने निवडणुकीला चांगलाच रंग येत आहे. पक्षीय उमेदवारांबरोबर अपक्षांचाही मोठा वाटा असल्याने अपक्षामुळे कोणाचा तोटा होणार, कोणाचा फायदा हे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजप १७, राष्ट्रवादी १७, शिवसेना ११, राष्ट्रीय काँग्रेस २ याशिवाय १३ अपक्षांनी कंबर कसली आहे. पक्षीय नेतृत्वाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असल्याने आत कोण कोणाला भारी पडेल हे मतदार दाखवून देणार आहेत. वार्ड क्रमांक तीनमध्ये नात्यागोत्यामधील उमेदवार समोरासमोर आहेत. यामध्ये नात्याने सासू सूना असलेल्या व मागील ग्रा. पं. निवडणुकीत सुनेला मागे टाकत सासूने उपसरपंचपद भूषविले होत. आता कोण हे मतदार ठरवणार आहेत. ग्रा. पं. चे सरपंच राहिलेल्या पुन्हा एक नंबर वार्डमधून नगरपंचायतसाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपाच्या उमेदवाराचे आव्हान आहे. कार्यकर्त्यांना उमेदवारांना बळ देण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रचारसभा, बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. आईचा जागर संपताच आता खुर्चीसाठी गोंधळ व त्याचा संबळ वाजणार आहे. एका वार्डात फेरबदल झाल्याने पक्षीय अधिकृत फॉर्म दिल्यानंतर आपापसात तडजोड करून भाजपाच्या उमेदवारात फेरबदल होऊन काकाच्या जागेवर पुतण्या निवडणूक लढवत आहे. |