बीडमध्ये निवडणुक कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात; ५० कर्मचारी बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 02:53 PM2019-04-17T14:53:27+5:302019-04-17T14:57:00+5:30
पाण्याचे टँकर घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक बसला आडवा आल्याने झाला अपघात
बीड : लोकसभा निवडणूकसाठी गुरूवारी मतदान आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. बुधवारी बसमधून मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात झाला. बस रस्त्याच्या खाली गेली, मात्र सुदैवाने ती न उलटल्याने बसमधील ५० कर्मचारी बालंबाल बचावले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास आष्टी तालुक्यातील डोईठाणा परिसरात घडली.
गुरूवारी मतदान असल्याने बुधवारी दिवसभर प्रशासनाची धावपळ सुरू होती. तर अधिकारी, कर्मचारी बुधवारी रात्रीच केंद्राच्या ठिकाणी मुक्कामी जाण्याच्या तयारी होते. असेच काही कर्मचारी आष्टी येथून बसमध्ये (एमएच २० बीएल २६८५) बसले. तालुक्यातील विविध केंद्रांवर कर्मचाऱ्यांना सोडत बस जात होते. डोईठाणा जवळ पाण्याचे टँकर घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक बसला आडवे आले. यामुळे बस चालकाने बस रस्त्याच्या खाली घातली. बाजुला बस खड्डयात गेली, सुदैवाने बस पलटी न झाल्याने बसमधील जवळपास ५० कर्मचारी बालंबाल बचावले. यातील कर्मचाऱ्यांना किरकोळ खरचटल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. प्रशासनाला याबाबत कळविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर जागेवरच सोडून पलायन केले.
तार न तुटल्याने दुर्घटना टळली
धावती बस रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या विद्यूत खांबाला धडकली. यावेळी विद्यूत प्रवाह सुरू होता. बस धडकल्याने स्पार्किंग झाली. सुदैवाने तार तुटली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सर्व कर्मचाऱ्यांनी बसमधून उतरताच सुटकेचा निश्वास सोडला. या बसमधील सर्व कर्मचारी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.