निवडणुकांची चाहूल : शहरात विविध कार्यक्रम वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:12+5:302021-08-20T04:38:12+5:30

प्रभागातील रखडलेल्या समस्याही आल्या ऐरणीवर अंबाजोगाई : नगर परिषदेच्या निवडणुका जवळ आल्याची चाहूल आता शहरवासीयांनाही लागली आहे. ...

Election season: Various programs have increased in the city | निवडणुकांची चाहूल : शहरात विविध कार्यक्रम वाढले

निवडणुकांची चाहूल : शहरात विविध कार्यक्रम वाढले

Next

प्रभागातील रखडलेल्या समस्याही आल्या ऐरणीवर

अंबाजोगाई : नगर परिषदेच्या निवडणुका जवळ आल्याची चाहूल आता शहरवासीयांनाही लागली आहे. गेल्या अनेक वर्षांत न फिरकणारे नगरसेवकही खडबडून जागे झाले आहेत. या निमित्ताने आता रखडलेल्या समस्याही ऐरणीवर आल्या आहेत, तर अनेकांनी आता विविध उपक्रम व कार्यक्रम सुरू केले आहेत.

कोरोनामुळे गेले दीड वर्षे ठप्प राहिले. अंबाजोगाई शहर एप्रिल व मे महिन्यांत कोरोनाचे हॉटस्पॉट राहिले. शहरात हजारो जणांना कोरोनाची बाधा झाली, तर शेकडो जणांचा बळी गेला. स्थिती गंभीर राहिली. जून-जुलै महिन्यांपासून परिस्थिती नियंत्रणात आली. अनेक कुटुंबांवर संकटांचा डोंगर कोसळला. यात अनेकजण सावरले. पण, कुटुंबातील सदस्य गमावल्याची रुखरुख आजही अनेकांच्या मनात आहे. अशा कठीण प्रसंगांत कोण कोणाच्या मदतीला धावून आले, कोणाची मदत कशी झाली, कोणी कोणाला बगल दिली.या सर्व गोष्टींची उकल आता सुरू झाली आहे. शासनाने कडक निर्बंध दूर करून बाजारपेठेसह अनेक गोष्टी खुल्या केल्या आहेत.

त्यातच, न्यायालयानेही आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेवर घ्या, असे शासनाला सुचवल्याने नगर परिषदेच्या निवडणुका लवकरच लागतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. डिसेंबर महिन्यात नगर परिषदेचा कालावधी संपतो. जर निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या, तर तीन महिन्यांत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच कमी झालेले निर्बंध यामुळे अनेकांनी १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या कामाची सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांनंतर या वर्षीचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होताना दिसला. तर, आता इच्छुकांचे वाढदिवसही जोरात होऊ लागले आहेत. शहरात हळूहळू बॅनरबाजी जोर धरू लागली आहे.

वाढदिवसानिमित्त जेवणावळी वाढल्या आहेत. प्रभागात रखडलेली कामे, निर्माण झालेल्या समस्याही अचानक ऐरणीवर आल्या आहेत. तर, राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकही आता दररोज नगर परिषद कार्यालयात दिसू लागले आहेत. एकूणच राजकीय वातावरण निर्माण होऊ लागले आहे. शहरातही आता नगर परिषद निवडणुकीबाबत चर्चा होऊ लागली आहे. नवीन इच्छुकांनीही कोणी सेवेच्या तर कोणी बॅनरबाजीच्या माध्यमातून आपण भावी उमेदवार आहोत, अशी आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकंदरीत दीड वर्षांपासून झालेले शांततामय वातावरण मात्र आता राजकीय रंग घेऊ लागले आहे.

Web Title: Election season: Various programs have increased in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.