हीटरमधून बसला विजेचा धक्का; पती - पत्नीचा जागीच मृत्यू, कुटुंबावर आघात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 10:56 AM2023-01-25T10:56:42+5:302023-01-25T10:57:52+5:30

केज तालुक्यातील घटना, पत्नीला वाचविताना पतीचाही झाला मृत्यू

Electric shock from the heater; Death of husband and wife on the spot, trauma to the family | हीटरमधून बसला विजेचा धक्का; पती - पत्नीचा जागीच मृत्यू, कुटुंबावर आघात

हीटरमधून बसला विजेचा धक्का; पती - पत्नीचा जागीच मृत्यू, कुटुंबावर आघात

googlenewsNext

- मधुकर सिरसट
केज ( बीड ):  तालुक्यातील पिंपळगाव (घोळवे )येथील पती, पत्नीचा पाणी तापविण्याच्या हिटरमधून बसलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे (50) आणि इंदूबाई ज्ञानेश्वर सुरवसे (45) अशी मृतांची नावे आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे हे पत्नी इंदूबाई आणि आईसह पिंपळगाव येथे राहतात. आज पहाटे 4 वाजता झोपेतून उठल्यानंतर इंदुबाई या हिटर लावण्यासाठी पाण्याने भरलेली बकेट घेऊन विजेच्या बोर्डाकडे गेल्या. हिटर लावताच त्यांना विजेचा धक्का बसला. हे लक्षात येताच ज्ञानेश्वर यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात दोघा पती, पत्नीचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक उमेश आघाव आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मृतांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि वयोवृद्ध आई आहेत. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी कुटुंबावर दोन आघात
सुरवसे दाम्पत्यांना 3 मुली आणि 1 मुलगा अशी 4 अपत्य होते. 12 वर्षांपूर्वी 1 मुलगी पाण्यात बुडून मृत्यू पावली होती, तर दुसरीने 5 वर्षा पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर एका मुलीचा विवाह झाला असून मुलगा बीडला शिक्षण घेतो आहे.

Web Title: Electric shock from the heater; Death of husband and wife on the spot, trauma to the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.