डोहात वीज सोडून मासे पकडणे बेतले जीवावर; धारूरमध्ये दोन युवकांचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 10:14 AM2020-11-13T10:14:45+5:302020-11-13T10:16:20+5:30
धारूर तालूक्यातील काळ्याचीवाडी येथील घटना
धारूर : धारूर तालूक्यातील काळ्याचीवाडी येथे मासे पकडण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन युवकांचा डोहात सोडलेला विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.समाधान सहदेव रुपनर ( 21) आणि दिपक मारूती रुपनर ( 19 )अशी मृतांची नावे असून ते नात्याने चुलते-पुतणे होते. गुरूवारी सांयकाळी ही दुर्दैवी घटना घडली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रुपनर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काळ्याचीवाडी मुख्य रस्त्यापासून दुर डोंगरात आहे. सुट्टी असल्याने गावातील नात्याने चुलते-पुतणे समाधान सहदेव रुपनर ( 21) आणि दिपक मारूती रुपनर ( 19 ) हे दोघे गुरूवारी दुपारी गावापासून एक कि.मी असणाऱ्या नदीवर मासे पकडण्यासाठी गेले होते. डोहात विजेचा कंरट सोडून मासे पकडण्याची पध्दत त्यांना माहीत होती. दोघांनीही तसेच मासे पकडणे ठरवले मात्र हे त्यांच्या अंगलट आले. विजेचा शॉक लागून दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.
गुरूवारी सांयकाळपर्यन्त दोघेही घरी परतले नाहीत म्हणून समाधानचे वडील काही ग्रामस्थांसह नदीकडे गेले. त्यावेळी त्यांना दोघेही मृत अवस्थेत आढळून आले. मृतामधील समाधान हा पोलीस भरतीची तयारी करत होता, तर दिपक आयटीआयची परीक्षा देऊन आला होता. धारूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून ग्रामीण रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू होते.