बिल वसुलीवरून मह्सुलचा विद्युत पुरवठा खंडित, तर थकीत करामुळे महावितरणला ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 07:51 PM2022-03-25T19:51:20+5:302022-03-25T19:51:56+5:30

महावितरणने तहसील, उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा विद्युत पुरवठा तोडला, तर तहसीलने महावितरण कार्यालयाला सील ठोकले!

Electricity supply cut off of revenue depts office due to recovery of bills, so due to tax pending mahavitaran office sealed by tahasil | बिल वसुलीवरून मह्सुलचा विद्युत पुरवठा खंडित, तर थकीत करामुळे महावितरणला ठोकले सील

बिल वसुलीवरून मह्सुलचा विद्युत पुरवठा खंडित, तर थकीत करामुळे महावितरणला ठोकले सील

Next

अंबाजोगाई - येथील तहसील आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे विद्युत बिलापोटी जवळपास पाच लाख रुपये थकल्याने महावितरणने या दोन्ही कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित केला. तर ही कारवाई जिव्हारी लागल्याने महसूल विभागानेही ६९ लाखांचा अकृषीक कर थकल्याने अंबाजोगाई येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला सील ठोकले. दोन्ही विभागाने जशास तसे उत्तर दिल्याने शासकीय कार्यालयांच्या एकमेकावरील कुरघोडीची चर्चा शहरात रंगली आहे. 

मार्च एन्डमुळे सध्या सर्वच विभागांचा वसुलीवर जोर आहे. अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीने थकीत बिलापोटी वसुली करण्यावर भर दिला आहे. तसेच महसूल विभाग अकृषिक कराच्या वसुलीवर भर देत आहे. महावितरणचे वीजबिलापोटी अंबाजोगाई तहसील कार्यालयाकडे ३ लाख ९४ हजार रुपये तर उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे ८५ हजार रुपये थकले होते. यापैकी १ लाख ३७ हजारांच्या रकमेचा धनादेश दोन दिवसापूर्वीच महावितरणला देण्यात आला होता. तरीदेखील मोठी रक्कम थकीत असल्याने कार्यकारी अभियंता यांच्या आदेशाने महावितरणच्या वसुली पथकाने शुक्रवारी (दि.२५) तहसील आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयासह तहसीलदारांच्या निवासस्थानाचा विद्युत पुरवठा तोडला. यामुळे शुक्रवारी दिवसभर या दोन्ही कार्यालयातील कामकाज विजेअभावी ठप्प होते. 

दुसरीकडे ही कारवाई जिव्हारी लागल्याने महसुलनेही वीजवितरण कंपनीला चांगलाच दणका दिला. महावितरण कार्यालयाकडे अकृषी करापोटी थकलेल्या ६८ लाख ८४ हजार रुपयांच्या थकबाकीचा दाखला देत तहसीलदार बिपीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या पथकाने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला सील ठोकले. त्यामुळे महावितरणच्या कार्यालयातही महसूल कार्यालयाप्रमाणेच गोंधळ उडाला. प्रशासनातील दोन विभागातील बदल नाट्याची चर्चा मात्र शहरात रंगली. दरम्यान, दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्राथमिक टप्प्यात तहसीलदारांचे निवासस्थान वगळता दोन्ही कार्यालयाचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Electricity supply cut off of revenue depts office due to recovery of bills, so due to tax pending mahavitaran office sealed by tahasil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.