अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी पुन्हा एल्गार; रास्तारोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 04:02 PM2023-08-09T16:02:49+5:302023-08-09T16:03:37+5:30
बीड जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अंबाजोगाई जिल्हा करावा, अशी मागणी अंबाजोगाईकर गेल्या ३० वर्षांपासून करीत आहेत.
अंबाजोगाई :बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई स्वतंत्र जिल्हा निर्माण करावा. या मागणीसाठी येथील यशवंतराव चव्हाण चौकात आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे एकतास वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या मोठ्या रांगा या परिसरात लागल्या होत्या.
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती कृती समितीच्यावतीने क्रांतीदिनी जिल्ह्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. यानुसार सर्व पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले. बीड जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अंबाजोगाई जिल्हा करावा, अशी मागणी अंबाजोगाईकर गेल्या ३० वर्षांपासून करीत आहेत.
या मागणीकडे प्रशासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत जिल्हा निर्मिती होत नाही तोपर्यंत विविध माध्यमातून आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी जाहीर केले. आंदोलनामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाच्या वतीने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आंदोलनाच्या परिसरात तैनात ठेवण्यात आला होता.
आंदोलनात माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, भाजपाचे नेते अक्षय मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया, शिवसेनेचे गजानन मुडेगावकर, मनसेचे सुनील जगताप, रिपाई, काँग्रेस, पक्ष, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई यांच्यासह सर्वपक्ष, सामाजिक संघटना व कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी होते.