जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांची होणार निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:37 AM2021-08-20T04:37:53+5:302021-08-20T04:37:53+5:30
जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी कोणाची निवड होणार? जिल्हा परिषदेने प्रस्ताव मागविले बीड : दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ. ...
जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी कोणाची निवड होणार?
जिल्हा परिषदेने प्रस्ताव मागविले
बीड : दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येते. यावर्षीचा जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पात्र शिक्षकांची माहिती गटविकास अधिकारी व पंचायत समिती सभापतींच्या संमतीने २४ ऑगस्टपर्यंत विनाविलंब पाठविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. ३१ मे २०२१ रोजी मुख्याध्यापकांची या जिल्ह्यात सलग सेवा वीस वर्षे व शिक्षकांची पंधरा वर्षे असावी. जे शिक्षक प्रतिनियुक्तीवर आहेत व नियमित वर्ग अध्यापन करत नाहीत, अशा शिक्षकांची शिफारस करू नये. शिक्षकांचे शैक्षणिक कार्य, राष्ट्रीय कार्य, सामाजिक कार्य, ऑनलाइन शिक्षण, बाला उपक्रम, माझी शाळा सुंदर शाळा, कोविड -१९ आपत्तीमध्ये केलेले कार्य, घनवन उपक्रमांतर्गत केलेली कामे अंतरिक्ष शाळा, ॲस्ट्रोनॉमी क्लब आदी उपक्रमांमध्ये घेतलेला सहभाग तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती विचारात घेऊन संबंधित शिक्षकांची शिफारस करावी, असे सुचविण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यातून दोन प्राथमिक शिक्षक, दोन माध्यमिक शिक्षक, एक विशेष शिक्षकांची (कला क्रीडा व कार्यानुभव तसेच दिव्यांग) माहिती मागविण्यात आली आहे. पाच शिक्षकांपैकी किमान एक महिला शिक्षिका असावी, असेही सुचविण्यात आले आहे. जिल्हा समितीच्या अंतिम पडताळणीनंतर पुरस्कार यादी जाहीर होणार आहे.
----------
गुन्हा दाखल असेल, तर शिफारस करू नका
गुन्हा दाखल झालेले तसेच विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित असलेल्या शिक्षकांची शिफारस करू नये, याबाबत सजग करण्यात आले आहे. शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे २० ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावा. तसेच गटशिक्षण अधिकाऱ्यांनी २३ ऑगस्टपर्यंत प्राप्त प्रस्तावांची छाननी करून २४ ऑगस्ट रोजी जिल्हा शिक्षण कार्यालयास प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.