'राखेचे प्रदूषण हटाव, ग्रामस्थ बचाव'; प्रदूषणाने त्रस्त दादाहरी वडगावचे ग्रामस्थ करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 05:24 PM2021-02-10T17:24:24+5:302021-02-10T17:45:07+5:30
परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव,दाऊतपूर शिवारात थर्मल चे राख तळे असून या राख तळ्यातून दररोज 4000 टिप्पर भरून राखेची वाहतूक केली जाते.
परळी : औष्णिक विद्युत केंद्र थर्मलचे दादाहरी वडगाव व दाऊतपूर येथील शिवारात राखसाठा करण्यात येतो. मात्र यामुळे प्रचंड प्रदूषण होत असून याचा येथील ग्रामस्थांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. याप्रश्नी 'प्रदूषण हटाव व वडगावकर बचाव' अशी घोषणा देत ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे.
परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव,दाऊतपूर शिवारात थर्मल चे राख तळे असून या राख तळ्यातून दररोज 4000 टिप्पर भरून राखेची वाहतूक केली जाते. वाहतुकी दरम्यान खाली पडणाऱ्या राखेमुळे परळी- गंगाखेड रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. राखेच्या प्रदूषणामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, दादा हारी वडगाव येथील साडेतीन हजार ग्रामस्थांना राखेच्या प्रदूषणाचा गेल्या अनेक वर्षापासून त्रास होत आहे. त्यांना डोळ्यांचे व फुफूसाचे आजार जडले आहेत. त्यांनी सातत्याने प्रदूषण थांबविण्याची मागणी करूनही परळी विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्याकडून कसलीही ठोस कारवाई केली जात नाही. यामुळे त्रस्त ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असून 12 फेब्रुवारी रोजी परळी -गंगाखेड रस्त्यावरील दादाहरी वडगाव जवळ रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ते निवेदन ग्रामस्थांनी तहसील प्रशासनास दिले आहे. यावर राखेच्या प्रदूषणासंदर्भात परळी विद्युत केंद्र व ग्रामीण पोलिसांना सूचना देण्यात आल्या असून त्यादृष्टीने कारवाई सुरु असल्याची माहिती नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी दिली आहे.
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
ग्रामस्थांमध्ये असंतोष असून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दादाराव वडगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे यांनी दिली. राख प्रदूषण नियंत्रण समितीने जी चळवळ सुरू केली .त्या चळवळीतमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ.मनोज मुंडे यांनी केले आहे.
राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गेल्या तीन दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे. राखसाठे उद्ध्वस्त करून संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात येतील. - शिवलाल पूरभे, पोलीस निरीक्षक, परळी ग्रामीण