मासिक ठेव योजनेत अपहार; शाखा डाकपालाविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 06:46 PM2020-12-05T18:46:21+5:302020-12-05T18:48:00+5:30
खातेदारांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला.
केज : तालुक्यातील सोनेसांघवी येथील टपाल खात्याच्या शाखा डाकपालाने मासिक ठेव (आरडी) योजनेतील रक्कमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शाखा डाकपाल दत्तात्रय कविदास काळे याच्याविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि. 3 ) ठेवीदार व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सोनेसांगवी येथील पोस्ट कार्यालयात शाखा डाकपाल या पदावर गावातील दत्तात्रय काळे हे कार्यरत होते. मासिक ठेव योजनेत गावातील ५८ खातेदारांनी शाखा डाकपाल काळे यांच्याकडे ऑक्टोबर २०१५ ते एप्रिल २०१८ या कालावधीत रक्कमेचा भरणा केला होता. त्यांनी या खातेदारांना स्वीकारलेल्या रक्कमेची त्यांच्या पासबुकमध्ये सविस्तर नोंद ही करून दिली आहे. ही मासिक ठेव योजनेत खातेदारांनी भरणा केलेली रक्कम नियमितपणे शासनाकडे जमा करणे आवश्यक असते. परंतू डाकपालपाल काळेने अठ्ठावन खातेदारांनी भरलेली पासष्ठ हजार एकशे पन्नास रुपयांची रक्कम शासनाकडे जमा केली नाही.
काळे याने खातेदारांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबाजोगाईचे उपविभागीय डाक निरीक्षक सचिन मल्लिकार्जुन स्वामी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सीमाली कोळी या करत आहेत.