बीडच्या शासकीय रुग्णालयातून फरार अट्टल गुन्हेगार २४ तासाच्या आत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:16 PM2018-03-27T14:16:27+5:302018-03-27T14:27:53+5:30
शासकीय रुग्णालयातून पलायन केलेला अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा जाधवला २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आले. जाधवला सकाळी ९ लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून ताब्यात घेण्यात आले.
बीड : काल शासकीय रुग्णालयातून पलायन केलेला अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा जाधवला २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आले. जाधवला सकाळी ९ वाजता लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून ताब्यात घेण्यात आले.
आठ दिवसांपूर्वी जिल्हा कारागृहातून पलायनाचा प्रयत्न फसल्यानंतर आरोपी जाधव याने रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात जाऊन काचाने गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यातूनही बचावल्यानंतर सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा बालाजी जाधव (रा. रूपचंद नागर तांडा, जि. लातूर) याने पलायन केले. त्याच्या शोधासाठी बीड पोलिसांची पथके तत्काळ रवाना झाली होती. यातीलच एका पथकाने आज सकाळी ९ वाजेच्या दरम्यान आरोपी जाधवला लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून ताब्यात घेतले.
अशी झाली कारवाई
रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी .पी . मुंडे यांनी बीड पोलिसांच्या माहितीवरून आरोपी जाधवच्या शोधासाठी एक पथक तयार केले होते. पथकाने सोमवारी रात्रभर त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही. आज सकाळी पी.आय. मुंडे यांना तो रेणापूर शहराच्या आजूबाजूस असल्याची खबर मिळाली. यावरून रेणापूर पोलिस व लातूर एलसीबीच्या पथकास तो पिंपळफाटा येथे एका हॉटेलवर वेषांतर केलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याला बीड पोलीसांच्या स्वाधीन केले. या कारवाईत पीएसआय शिंगणकर, पोलीस कर्मचारी के बी गारूळे, पी. आर. सूर्यवंशी, डि.बी. शिंदे, एस.सी. गायकवाड, एस. एम. ठाकरे, एस.व्ही. नागुरे, एन. एस मालवदे, अगंद कोतवाड यांचा समावेश होता
जाधवने आणले जेरीस
१५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा कारागृहातून ज्ञानोबाने भिंतीवरून उडी मारत पलायनाचा प्रयत्न केला होता; परंतु उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारल्याने त्याचे दोन्ही पाय मोडले होते. त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. पुन्हा २४ मार्च रोजी शौचास जाण्याचा बहाणा करीत तो शौचालयात गेला व खिडकीतील काचाने स्वत:चा गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यातून बचावल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उपचार सुरू होते.