माजलगाव धरण परीक्षेत्र आणि केसापुरी कॅम्पवरील अतिक्रमण हटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 07:23 PM2020-10-14T19:23:12+5:302020-10-14T19:25:11+5:30
अतिक्रमण ७ दिवसांच्या आत स्वखर्चाने काढण्यात यावे असे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
माजलगाव : येथील केसापुरी कॅम्प परीसरात व राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टणम क्र.६१ लगत असलेल्या व धरण परीक्षेत्रात वसलेल्या अतिक्रमण धारकांना १० ऑक्टोबर रोजी नोटिस देण्यात आल्या.
माजलगाव उपसा सिंचन शाखा क्र.२ अंतर्गत शाखा अधिकारी यांच्या स्वाक्षरीनीशी जवळपास १५० लोकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. या जागेवरील असलेले अतिक्रमण ७ दिवसांच्या आत स्वखर्चाने काढण्यात यावे असे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे.यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ माजली असून आता तात्काळ आम्ही जायचं कुठं ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
धरण परीक्षेत्रात व रस्त्यालगत तीस ते पस्तीस वर्षापासून आपल्या कुटुंबासह व्यवसाय करुन उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु सदरील क्षेत्र शासन संपादित असल्यामुळे या नागरिकांना येथुन आज ना उद्या स्थलांतरित व्हावे लागणारच आहे. परंतु सध्या सर्वत्र कोविड १९ च्या महामारीमुळे आजवर रोजगार बंद असल्याने यांच्या -वर मोठं संकट उभे असून उपासमारीची वेळ आली असून अचानक आलेल्या नोटिसमुळे सध्या येथील धरण परीक्षेत्रातले नागरिक चिंतेत असून यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत दिलेली असून स्वखर्चाने काढून घेण्यात यावं अन्यथा या कार्यवाहीसाठी जो खर्च लागेल तो रीतसर वसूल करण्यात येईल असा धमकी वजा इशारा देण्यात आलेला आहे.
६० ते ७० कुटुंबिय जाणार न्यायालयात
माजलगाव धरण परीक्षेत्रात वसलेल्या अतिक्रमण धारक कुटुंबीय या जागेवर राहात असल्याने येथील नागरिकांनी शासनाला १९७६ पासून घरभाडे, वीज बिल,पाणीपट्टी भरल्याच्या ६० ते ७० कुटुंबीयांकडे पोहोच पावत्या पुरावा स्वरूपात उपलब्ध असल्याने सदरील नागरिक न्यायालयात दाद मागणार आहेत. या जागेवरील अतिक्रमण ७ दिवसांच्या आत काढण्यात यावेत, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.