अतिक्रमणांमुळे वाहतूकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:32 AM2021-03-19T04:32:55+5:302021-03-19T04:32:55+5:30
बीड : शहरातील जालना रोडवर सध्या सर्वत्र अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. बीड पालिकेकडून मागील ...
बीड : शहरातील जालना रोडवर सध्या सर्वत्र अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. बीड पालिकेकडून मागील अनेक महिन्यांपासून यावर कसलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर तात्काळ कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महावितरण कार्यालय परिसरात घाण
बीड : शहरातील महावितरण विभागाच्या माळीवेस भागातील उपविभागीय कार्यालय परिसरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास येथील कर्मचारी व विविध कामांसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
प्रशिक्षण केंद्रासमोर
रिक्षा पार्किंग
बीड : आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक अनधिकृतपणे पार्किंग करीत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वाहतूक शाखा पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
पोलिसांसमोरच
अवैध वाहतूक
बीड : शहरातील अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरनाका या भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोरच अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. रिक्षा, जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
चोऱ्या वाढल्याने गस्तीची गरज
वडवणी : गाडीतील पेट्रोल, बॅटरी, पाण्याची मोटार, पाईप, वायर अशा कंपाऊंडमधील वस्तुंच्या चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. तालुका व शहर परिसरातील विविध भागात साहित्याच्या सर्रास चोऱ्या होत आहेत. या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
शिरूर कासार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. समोरून एखादे वाहन गेल्यास दुचाकी चालकांना समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघातात वाढ होत आहे. धूळ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांचे वीज बील माफ करा
बीड : कोरोनामुळे शेतकरी, शेतमजूर यांचे नुकसान झालेले आहे. अशातच सक्तीची वीज बिल वसुली सुरू आहे. ही वसुली थांबवावी व वीज बिल माफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे, परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असून, वीज थकबाकीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडली जात असून, यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. यामुळे पिके वाळू लागली आहेत.
अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक
अंबाजोगाई : शहरातील अंतर्गत रस्ते अतिशय अरूंद असतानाही दिवसा शहरातील रस्त्यावरून जड वाहतूक होत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. शहरातील मंडीबाजार, गुरूवारपेठ या परिसरात मोठी वाहने व जड वाहने सातत्याने येत जात असल्याने याचा मोठा त्रास नागरिकांना निमूटपणे सहन करावा लागतो. वाहतुकीच्या वाढत्या कोंडीमुळे या परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसतो. अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक रात्रीच्या वेळी करावी, अशी मागणी व्यापारी सुनील जाधव यांनी केली.