इंग्रजी शाळेत मोफत प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:00+5:302021-01-23T04:34:00+5:30
बीड : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागांवर इंग्रजी शाळेत मोफत ...
बीड : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागांवर इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया यंदा ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पालकांनी जागृतपणे प्रवेश प्रक्रिया समजून घेऊन आपल्या पाल्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल करावेत, असे आवाहन आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये शैक्षणीक वर्ष २०२१-२२ या वर्षाकरिता बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची तरतूद केलेली आहे. या कायद्यानुसार खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये (अल्पसंख्याक शाळा वगळून) एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. ९ फेब्रुवारीपासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी २१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत आरटीई प्रवेशपात्र सन २०२०-२१च्या ऑटो फॉरवर्ड केलेल्या शाळा आणि नवीन नोंदणी केलेल्या शाळांची गटशिक्षणाधिकारी पडताळणीची प्रक्रिया करतील. ज्या पालकांना आरटीईअंतर्गत आपल्या पाल्यांचे अर्ज दाखल करण्यास मार्गदर्शन अथवा समस्या असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे मनोज जाधव यांनी कळविले आहे.