ऑक्सिगानच्या माध्यमातून कोविड रुग्णांचे मनोरंजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:33 AM2021-05-10T04:33:46+5:302021-05-10T04:33:46+5:30
बनसारोळा : केज तालुक्यातील बनसारोळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये रोटरी क्लब अंबाजोगाई, मानवलोक अंबाजोगाई, आरोग्य विभाग बीड, ...
बनसारोळा : केज तालुक्यातील बनसारोळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये रोटरी क्लब अंबाजोगाई, मानवलोक अंबाजोगाई, आरोग्य विभाग बीड, स्व. नारायणदादा काळदाते प्रतिष्ठान अंबाजोगाई व महाराष्ट्र विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गायक कलावंत प्रकाश बोरगावकर प्रस्तुत ऑक्सिगान कार्यक्रमातून रुग्णांचे मनोरंजन करीत मानसिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला. अनेक नव्या, जुन्या मराठी व हिंदी गीतांचा हा नजराणा रुग्णांना समर्पित करण्यात आला. दरम्यानचे तीन तास हे कसे निघून गेले, हे रुग्णांनाही कळले नाही.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी केले. व्यासपीठावर अंबाजोगाईचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, केजचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गालफाडे, महाराष्ट्र विद्यालयाचे सचिव डॉ. नरेंद्र काळे, रोटरीचे अध्यक्ष डॉ. पाचेगावकर, कल्याण काळे, संतोष मोहिते, प्रवीण चोकडा, प्रा. हरिदास सोमवंशी, डॉ. राजेश इंगोले, परमेश्वर गित्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र विद्यालयाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. आभार अविनाश धायगुडे यांनी मानले. उद्घाटन सोहळ्यानंतर तालमार्तंड प्रकाश बोरगावकर, डॉ. राजेश इंगोले, महादेव माने, परमेश्वर गित्ते, प्रदीप चोपने या कलावंतांनी हिंदी व मराठी गाणी कोविड रुग्णांसमोर सादर केली. यातील एकही कलावंत व्यावसायिक नसून, केवळ छंद म्हणून ते काम करत आहेत. या कलावंतांनी कोविड रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी पुढाकार घेतला.
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्वरांना रुग्णांचा प्रतिसाद
तालुक्यातील कोविड नियंत्रण व उपाययोजनेत प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणारे उपजिल्हाधिकारी झाडके यांच्यातील कलावंत यावेळी जागा झाला. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी ताज्या करत स्वतःदेखील त्यांनी गाणी गायिली. ज्यामध्ये सुधीर फडके यांचे ‘विठु माऊली तू, माऊली जगाची’ व स्व. किशोर कुमार यांचे गीत सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. एक उपजिल्हाधिकारी आपल्यासाठी गाणे गात असल्याचे लक्षात आल्यानंतर कोविड रुग्णांनीही प्रतिसाद दिला.
===Photopath===
090521\09bed_11_09052021_14.jpg