गावकारभारी निवडण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:21+5:302021-01-16T04:38:21+5:30
बीड : जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान शांततेत पार पडले. गावकारभारी निवडून आणण्यासाठी मतदारांनी मोठा उत्साह दाखविला. एकूण मतदान ...
बीड : जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान शांततेत पार पडले. गावकारभारी निवडून आणण्यासाठी मतदारांनी मोठा उत्साह दाखविला. एकूण मतदान ८३.५८ टक्के झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या, तर उर्वरित ११ ग्रामपंचायतींच्या ४१३ प्रभागातील १०५१ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. बीड तालुक्यात ८७ टक्के, अंबाजाेगाईत ८३.९५, धारुर ७६.४०, माजलगाव ७९.८२, गेवराई ८२.४१, आष्टी ८६.६५, केज ८०.९४, पाटोदा ८७.७२, वहवणी ८३.४४ शिरूर कासार तालुक्यात ८७.८७ टक्के मतदान झाले. एकूण १ लाख ३ हजार ४९८ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात ६१ हजार ७८८ स्त्री तर ७१ हजार ७१० पुरुष मतदारांचा समावेश होता.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील गावे, मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढविला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ४२४ मतदान केंद्रांवर २७० अधिकारी, तर १५३२ कर्मचारी नियुक्त केले होते.
गावचा कारभार हाती घेण्यासाठी अनेक ठिकाणी चुरस पहायला मिळाली. यातच थेट मतदारांपर्यंत प्रभावी संपर्कातून वेवगेळ्या पद्धतीने उमेदवारांनी विनवण्या केल्या. घरकुल, गावचे तसेच वैयक्तिक प्रश्न सोडविण्याची आश्वासने ग्रामस्थांना मिळाली. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून १८ रोजी निकाल लागणार आहे.