‘नवक्रांती’ची पर्यावरण जनजागृती; गणेशमूर्तीऐवजी वृक्षाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:38 AM2021-09-12T04:38:33+5:302021-09-12T04:38:33+5:30
संडे स्टोरी/ ... धारूर शहरातील ८० वर्षांची परंपरा असणाऱ्या नवक्रांती गणेश मंडळाकडून गतवर्षीपासून मूर्तीऐवजी वृक्षाची स्थापना केली जाते. दहा ...
संडे स्टोरी/
...
धारूर शहरातील ८० वर्षांची परंपरा असणाऱ्या नवक्रांती गणेश मंडळाकडून गतवर्षीपासून मूर्तीऐवजी वृक्षाची स्थापना केली जाते. दहा दिवस त्या वृक्षाचे पूजन करून विसर्जनाच्या दिवशी या वृक्षाचे रोपण केले जाते. या वृक्षाचे संवर्धन करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. याशिवाय विविध सामाजिक उपक्रमही हे मंडळ सातत्याने राबवत असून, या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
...
धारूर शहरातील नवक्रांती गणेश मंडळाचे हे ८० वे वर्ष आहे. विविध सामाजिक, समाजप्रबोधनपर उपक्रम राबवून हे मंडळ गणेशोत्सव साजरे करते. या मंडळाची स्थापना १९४२मध्ये झाली. मंडळ गतवर्षीपासून गणेशाची स्थापना वेगळ्या पध्दतीने करत आहे. श्री गणेशाच्या मूर्तीऐवजी हे मंडळ स्थापनेच्या दिवशी वृक्षाची मिरवणूक काढून त्यांची स्थापना करते. त्याचेच पूजन केले जाते. गतवर्षी आंब्याचे झाड लावले होते. त्यांचे रोपण ज्येष्ठ नागरिक प्रमोदकुमार तिवारी यांच्या शेतात करण्यात आले. त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. हे झाड सध्या डौलदार झाले आहे. ते सात ते आठ फूट उंच झाले आहे. यावर्षी आंब्याच्या झाडाचे पूजन करण्यात आले. त्याची स्थापना करण्यात आली आहे. श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी या झाडाचे रोपण करण्यात येणार आहे. वृक्ष संवर्धन चळवळीबरोबर पर्यावरणाचे रक्षण या उपक्रमामुळे होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष अमरजीत तिवारी, सचिव दिनेश कापसे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, कोषाध्यक्ष प्रवीण शेटे हे हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
...
व्यसनमुक्तीसाठीही पुढाकार
नवक्रांती मंडळ या उपक्रमाबरोबर रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थी सत्कार, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत आदी उपक्रम राबविण्यात हे मंडळ आघाडीवर आहे. युवावर्गाला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी व्यसनमुक्तीसारखे विविध उपक्रम हे मंडळ राबवत आहे.
110921\1229-img-20210911-wa0069.jpg~110921\img-20210911-wa0068.jpg
नृवक्रांती गणेश मंडळाने लावले गतवर्षी चे वृक्ष~यावर्षी वृक्षारोपन केलेले वृक्ष