अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार तास सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:25+5:302021-04-19T04:30:25+5:30
बीड : जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, बेकरी, चिकन-मटण विक्रीची ...
बीड : जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, बेकरी, चिकन-मटण विक्रीची दुकाने केवळ चारच तास सुरू ठेवण्याचे सुधारित आदेश जारी केले आहेत. १९ सप्टेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ‘ब्रेक द चेन’ या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत अत्यावश्यक सेवेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला आहे. त्यानुसार आता औषधी दुकाने वगळता इतर सर्व इतर आस्थापना यापुढे सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी बीड जिल्ह्यासह राज्यात १४ एप्रिलपासून अधिकचे निर्बंध लावले गेले. मात्र, तरीदेखील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्याने अखेर सोमवारपासून पूर्वीच्या आदेशात बदल केले गेले आहेत. नव्या आदेशानुसार मेडिकल वगळता किराणा, भाजीपाला, फळविक्री, बेकरी, चिकन, मटण विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचसोबत हातगाड्यावर फिरून फळविक्री करण्यासाठी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मुभा देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या या आदेशामुळे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया
प्रशासनाला सहकार्य करा
कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या पाहता पुन्हा निर्बंध घालावे लागत आहेत. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, नियमांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य कारवे
रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी, बीड
................
पोलीस कडक पावले उचलणार
जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे पोलीस प्रशासनाला देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट वाढत असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड
===Photopath===
180421\18_2_bed_3_18042021_14.jpg
===Caption===
पोलीस अधीक्षक बीड आर.राजा