अंबाजोगाईत मराठी विद्यापीठ स्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:05 PM2017-12-25T23:05:17+5:302017-12-25T23:06:43+5:30
अंबाजोगाई (जि. बीड) येथील योगेश्वरी महाविद्यालय परिसरात गेली दोन दिवस सुरू असलेल्या बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी रात्री उशिरा झाला. तमाम रसिकांच्या साक्षीने अंबाजोगाईत मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करून अंबाजोगाई आणि उदगीर या जिल्ह्यांची नव्याने निर्मिती करावी, असा ठराव संमत करण्यात आला.
सतीश जोशी
अंबाजोगाई (जि. बीड) : येथील योगेश्वरी महाविद्यालय परिसरात गेली दोन दिवस सुरू असलेल्या बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी रात्री उशिरा झाला. तमाम रसिकांच्या साक्षीने अंबाजोगाईत मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करून अंबाजोगाई आणि उदगीर या जिल्ह्यांची नव्याने निर्मिती करावी, असा ठराव संमत करण्यात आला.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी होते. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, दादा गोरे, दगडू लोमटे, संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, अमर हबीब, रामचंद्र तिरुके, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, भावना राजनौर, व्यंकटेश गायकवाड, किरण सगर, भास्कर बडे आदी उपस्थित होते.
या संमेलनात १२ ठराव संमत करण्यात आले. विविध क्षेत्रांतील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेती खर्चावर आधारित पिकांंना हमी भाव देऊन शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, लातूर-मुंबई, धर्माबाद-मुंबई या मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण करून परळी-बीड-नगर हा होऊ घातलेला रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, सर्वेक्षण झालेल्या घाटनांदूर-श्रीगोंदा या रेल्वेमार्गास मान्यता देऊन अंमल करावा, दासोपंतांचे साहित्य शासनाने प्रकाशित करावे, अंबाजोगाईस पर्यटनाचा ‘अ’ दर्जा द्यावा, मसापसाठी अंबाजोगाई पालिकेने जागा द्यावी, यासह मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईत स्थापन करण्याचा आणि उदगीर, अंबाजोगाई नव्या जिल्ह्यांची निर्मिती करावी, असे ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आले.
स्वागताध्यक्ष सभापती राजेसाहेब देशमुख यांनी हे संमेलन यशस्वी करणाºयांचे आभार मानले. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आपल्या भाषणात साहित्याच्या निर्मितीबद्दल भाष्य केले. मराठी लेखकात आत्मनिष्ठा नाही. जे साहित्य ते निर्माण करतात, त्याचे अनुकरण वास्तविक जीवनात नसते, असे ते म्हणाले. बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.