ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी ग्रामसमिती स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:28+5:302021-05-09T04:35:28+5:30

गंगाभिषण थावरे यांची मागणी माजलगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या ...

Establish village committees for corona control in rural areas | ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी ग्रामसमिती स्थापन करा

ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी ग्रामसमिती स्थापन करा

Next

गंगाभिषण थावरे यांची मागणी

माजलगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. मागच्या लॉकडाऊनमध्येही अशीच परिस्थिती होती. मात्र, त्यावेळच्या प्रशासकीय टीमने योग्य नियोजन केल्याने परिस्थिती आटोक्यात आली होती. आता पुन्हा ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव जोरात होत असून, या परिस्थितीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात ग्रामसमिती स्थापन करून कडक लॉकडाऊन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.

मराठवाड्यात बीड जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे तरुण ते वृद्ध या वयोगटातील लोकांना जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी उत्तम कामगिरी केली होती. वेळीच निर्णय घेतल्याने जिल्ह्यात कोरोनाचा उशिरा शिरकाव झाला होता. मागच्या वेळी ग्रामीण भागात कोरोचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासकीय टीमने प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीसपाटील, ग्रामपंचयत सदस्य यांची ग्रामसमिती नियुक्त केली होती. या समितीने गावात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली. बाहेरील लोकांना गावाबाहेरच राहू दिले, तर कोणालाही गावात फिरू दिले नाही. यामुळे मागच्या वेळी ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली नाही. परंतु आजच्या दुसऱ्या लाटेमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागात दुपटीने रुग्ण संख्या झाली आहे. यामुळे गाव खेड्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा गावस्तरावर ग्रामसमिती नियुक्त करून ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन करावे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांनीही पुढाकार घेऊन आपापल्या वॉर्डात, गटात, गणात जाऊन नागरिकांचे मनोबल वाढवावे व नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करावे. असे नियम राबवले तर ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल नाहीतर प्लेगच्या काळातील परिस्थिती उद्भवल्याशिवाय राहणार नाही असेही गंगाभिषण थावरे म्हणाले.

Web Title: Establish village committees for corona control in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.