मातृत्व हिरावलेल्या कालवडीचे पालकत्व स्वीकारून निभावले देखील - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:37 AM2021-03-01T04:37:55+5:302021-03-01T04:37:55+5:30
शिरूर कासार : एक वर्षापूर्वी जन्मताच नियतीने मातृत्व हिरावलेल्या कालवडीचे पालकत्व स्वीकारून तिचा सांभाळ अगदी पोटच्या मुलीप्रमाणेच केला आणि ...
शिरूर कासार : एक वर्षापूर्वी जन्मताच नियतीने मातृत्व हिरावलेल्या कालवडीचे पालकत्व स्वीकारून तिचा सांभाळ अगदी पोटच्या मुलीप्रमाणेच केला आणि वर्षपूर्ती देखील आनंदात साजरी केली. अगदी साबण लावून स्वच्छ आंघोळ, नवा कपडा पांघरूण गोड घास तर भरवलाच. परंतु, तिचे औक्षणदेखील करून पालक मातेने भूतदयेचा आदर्श समोर ठेवला.
तालुक्यातील राक्षसभुवन येथील एक जोडपे जीवन कदम व त्यांची धर्मपत्नी शितल कदम यांनी गतवर्षी जन्मताच चौथ्या दिवशी मातृत्व गमावलेल्या गायीच्या वासराचे (कालवडीचे) मुलगी म्हणून पालकत्व स्वीकारले होते. तिला अगदी बाटलीने दूध पाजले. पुढे ती मोठी होत गेली आणि चारा खाऊ लागली. आज ती कालवड त्यांच्या घरातील एक सदस्य बनली आहे. ‘ती’चे नामकरण या जोडप्याने ‘ॲनिव्हर्सरी’असे केले. याचे कारण देखील ती त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशीच घरी आणली होती. या कालवडीच्या आईचा मृत्यू पोटात प्लास्टिक गेल्याने झाला होता.
ही गोंडस कालवड आता बरोबर एक वर्षाची झाली. तिची वर्षपूर्ती म्हणजेच वाढदिवस पोटच्या लेकराप्रमाणेच करून एक वेगळा आनंद मिळविला. कालवडीचे कोडकौतुक मुलीप्रमाणेच करून या दाम्पत्याने भूतदयेचा अनुकरणीय आदर्श समोर ठेवला आहे.
पालकत्व स्वीकारल्याचे सचित्र वृत्त लोकमतने १७ मार्च २०२० रोजी प्रकाशित केले होते. आज पुन्हा या आदर्शाचा आदर्श वर्षपूर्ती साजरी करून त्यांनी समोर ठेवला आहे. कदम दाम्पत्याला दोन मुलगे व एक मुलगी असून ही कालवड निसर्गाने आम्हांला दिलेले चौथे अपत्य समजत असल्याचे शितल व जीवन कदम यांनी सांगितले.
===Photopath===
280221\28bed_4_28022021_14.jpg