बीड जिल्ह्यात मंजुरीनंतरही निम्म्याच चारा छावण्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 07:09 PM2019-03-28T19:09:40+5:302019-03-28T19:10:51+5:30
मंजूर होऊनही चारा छावण्या सुरू नसल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
- प्रभात बुडूख
बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शासनाने मागेल त्या ठिकाणी चारा छावण्यांना मंजुरी दिली. मात्र मंजूर केलेल्या ८३७ छावण्यांपैकी ११५ छावण्या सुरू न झाल्यामुळे त्यांची मंजुरी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर दुसरीकडे परिसरात मंजूर होऊनही चारा छावण्या सुरू नसल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
जिल्ह्यातील जनावरांची संख्या १२ लाखांच्या जवळपास आहे. त्यापैकी ८ लाख २२ हजार गाय आणि म्हैस वर्गातील जनावरे आहेत. आजघडीला जिल्ह्यात ८३७ छावण्यांना मंजुरी दिलेली आहे. त्यापैकी ४६९ चारा छावण्या कार्यरत आहेत. मात्र, मंजुरी मिळूनदेखील मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पशुपालक मात्र अडचणीत आला.
मंजुरीनंतर चारा छावणी सुरू करण्यास प्रशासनाने आठ दिवसांची मुभा दिली होती. त्यानंतर मंजुरी मिळूनदेखील सुरू न झालेल्या चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार चारा छावण्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
115 चारा छावण्या केल्या बंद
जिल्ह्यात सर्वाधिक बीड तालुक्यात ३०० तर आष्टी तालुक्यात २९३ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी आष्टीत १६४ छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर मंजुरी असूनदेखील कार्यरत न केलेल्या ११५ चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. इतर तालुक्यातील सुरू न झालेल्या छावण्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
भरारी पथकांची नेमणूक
यापूर्वी चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. हा सर्व प्रकार तत्कालीन जिल्हाधिकारी व आताचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उघड करून छावणीचालकांवर कारवाई केली होती. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी व आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली असून, गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
गैरप्रकार आढळ्यास कारवाई
चारा छावण्यांवरील नियंत्रणासाठी संबंधित अधिकारी व तहसीलदारांना योग्य कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्यक्ष छावण्यांवर जाऊन आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे गैरप्रकार टाळता येतील. जर कुठे गैरप्रकार आढळून आले तर चारा छावणीचालक व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड