एक लाखाचे पॅकेज देऊनही सालगडी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:15+5:302021-04-13T04:32:15+5:30

कडा : गुढीपाडव्यापासून शेतकऱ्यांचे शेतीच्या हंगामाचे नवे वर्ष सुरू होते. त्‍यामुळे पुढील शेती हंगामासाठी नवा सालगडी ठेवण्यासाठी ...

Even after giving a package of one lakh, Salgadi was not available | एक लाखाचे पॅकेज देऊनही सालगडी मिळेना

एक लाखाचे पॅकेज देऊनही सालगडी मिळेना

Next

कडा : गुढीपाडव्यापासून शेतकऱ्यांचे शेतीच्या हंगामाचे नवे वर्ष सुरू होते. त्‍यामुळे पुढील शेती हंगामासाठी नवा सालगडी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे सालगड्यांनी विविध पॅकेजची मागणी केल्यामुळे ऐनवेळी नवीन वर्षात शेतकरी अडचणीत सापडला आहे. एक लाखाचे पॅकेज देऊन सालगडी मिळेना, अशी स्थिती आहे.

शेतीमध्ये कामे करण्यापेक्षा शहराकडे ग्रामीण भागातील नवीन पिढी धाव घेत असल्यामुळे शेतमालकांना सालगडी मिळणे कठीण झाले आहे. शेतातील गहू निघताच नवीन सालगडी पुढील हंगामासाठी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये आपसातच स्पर्धा लागली आहे. निसर्गाच्या लहरीपणावर हा ग्रामीण भागातही खेळला जाणारा शेती जुगार असल्याची भावना नवीन पिढीत निर्माण झाल्याने ती शहरात लहान-मोठे काम करण्यास उत्सुक आहे. त्यामुळे शेतकऱ्याची दुसरी पिढी शेती करण्यासाठी तयार नाही, त्यातच सालगडी व मजुरांचा तुटवडा शेतीच्या कामासाठी निर्माण झाला आहे. शेतमालकांची मोठी कोंडी होत असून, शेतमालक या गावावरून त्या गावावर सालगडी शोधत फिरत आहे. त्यासाठी कोणी कोणी बिहार, मध्यप्रदेशातून कुटुंबासह सालगडी आणत आहेत. यावर्षी पाऊस चांगला झाला असल्यामुळे पुढील हंगामातील शेतीसाठी शेतकऱ्यांनी गुढीपाडव्याला नवा सालगडी ठेवला आहे; परंतु यावर्षी त्याच्या मागणीत मोठीच वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांनी काही जणांच्या सालदारीत वाढ करून त्यांना पुढच्या वर्षासाठी कायम केले तर काहींनी सालदारी कायम करण्यास असमर्थता दाखविल्याने नवा सालगडी शोधण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. हुशार, मेहनती, निर्व्यसनी सालगड्याला सर्वच शेतकऱ्यांनी प्रथम पसंती दिली. एका वर्षाला एक लाख ते दीड लाख साल ठरवले जात असून, त्यातही काम करत असताना सुटी न धरण्याची मागणी सालगड्यांनी केली आहे.

सालचंदीच्या मागणीत वाढ

या सालगड्यांनी सालाच्या पैशाव्यतिरिक्त मोबाइल व त्याच्या रिचार्जचा खर्च, वर्षाला दोन क्विंटल गहू, दोन क्विंटल ज्वारी, त्यासोबतच शेतात टी.व्ही. पाहण्यासाठी डिश व दुधाची मागणी सालगडी करतात. सालगड्याच्या बायकोला वर्षभर शेतात काम मिळते. त्याचा वेगळा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा लागतो.

यांत्रिक पद्धतीने शेती करण्यावर सध्यातरी शेतकरी भर देत असून कमीतकमी मनुष्यबळ लागेल याकडे सध्या शेतकरी लक्ष देत आहेत.

नवीन शोधण्यापेक्षा जुन्यालाच सालवाढ

माझ्याकडे पंधरा ते वीस एकर बागायती शेती, दोन मोठे शेततळे असून सध्या ऊस, डाळिंब बाग, लिंबोनी बाग तसेच यावर्षी नवीन चार एकर द्राक्ष बाग लावली आहे. एवढ्या मोठ्या जमिनीच्या मेहनतीसाठी मला दोन सालगडी ठेवावे लागतात. शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. प्रत्येक वर्षी नवीन सालगडी शोधण्यापेक्षा जुन्याच सालगड्याला सालाची रक्कम वाढवून द्यावी लागत असल्याचे चोभा निमगाव येथील सतीश झगडे यांनी सांगितले.

मर्जीप्रमाणे रक्कम, कशाला दुसरीकडे जायचे

मागील दहा वर्षांपासून मी सतीश झगडे यांच्याकडे सालाने असून, शेती मालक स्वभावाने चांगले आहेत. त्यामुळे मी दुसरीकडे कुठेही जाण्याचा विचार करत नाही. प्रत्येक वर्षी मला माझ्या मर्जीप्रमाणे सालाची रक्कम व धान्य मिळते.

- शेट्टीबा गायकवाड, सालगडी

Web Title: Even after giving a package of one lakh, Salgadi was not available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.