वयाच्या पंचहत्तरीतही हेमा मालिनी नृत्यास समर्पित; राधा रासबिहारी संगीतनाट्यास प्रेक्षकांची दाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 07:00 PM2024-09-11T19:00:13+5:302024-09-11T19:01:20+5:30
राधे राधे चा जयघोष! अभिनेत्री,खासदार हेमामालिनी यांच्या प्रमुख भूमिकेतील राधा रासबिहारी संगीत नाट्यात प्रेक्षक तल्लीन
परळी - येथील नाथ प्रतिष्ठानच्या श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवात मंगळवारी सायंकाळी ड्रीम गर्ल, सिने अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिकेतील 'राधा रासबिहारी' या संगीत नाट्याचे आयोजन करण्यात आले होते. खासदार हेमा मालिनी पहिल्यांदाच परळीत आल्याने या कार्यक्रमाचे परळीकरांमध्ये आकर्षण होते. वयाच्या पंचहत्तरी पूर्ण केलेल्या हेमा मालिनी यांचा नृत्य आणि अभिनयाप्रति समर्पण पाहून प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली.
'राधा रासबिहारी' या संगीत नाट्यातील विविध वेशभूषेतील ५० कलाकारांचे दिग्दर्शन आणि निर्मिती स्वतः हेमा मालिनी यांनी केली आहे. अभिनय, दिग्दर्शन त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराच्या मेकअप पासून ते वेशभूषेपर्यंत सर्व गोष्टींवर हेमा मालिनी स्वतः नजर ठेवून होत्या. अभिनेत्री हेमामालिनी यांनी साकारलेल्या राधेने आणि सोबतच श्रीकृष्ण व गोपिकांची रासलीला, सुदामापासून कंसापर्यंतच्या विविध साकारलेल्या भूमिकांच्या सादरीकरणाने परळीकरांना अक्षरशः तल्लीन केले.
अभिनेत्री तथा खासदार हेमामालिनी यांचे नाथ प्रतिष्ठानच्यावतीने राजश्री धनंजय मुंडे यांनी स्वागत केले. त्याचबरोबर नाथ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आलेल्या सर्व कलाकारांचे यथोचित स्वागत यावेळी करण्यात आले. निता बाजपेयी यांनी संगीत नाट्याचे बहारदार संचलन केले. यावेळी राधे राधे ,गणपती बाप्पा मोरया अशी मनोगताची सुरुवात करत हेमा मालिनी यांनी परळीत आल्यानंतर चांगले वाटले. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक चळवळ जोपासली आहे, असे कौतुक केले.