गणेशोत्सवातही ट्रॅव्हल्सला प्रवाशांची प्रतीक्षाच; रोज धावतात केवळ सहा गाड्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:38 AM2021-09-15T04:38:52+5:302021-09-15T04:38:52+5:30
बीड : कोरोनामुळे संकटात सापडलेल्या ट्रॅव्हल्स चालकांना गणेशोत्सवात तरी प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु आताही प्रतिसाद मिळत ...
बीड : कोरोनामुळे संकटात सापडलेल्या ट्रॅव्हल्स चालकांना गणेशोत्सवात तरी प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु आताही प्रतिसाद मिळत नसल्याच्या प्रतिक्रिया मालकांनी व्यक्त केल्या. रोज शहरातून केवळ सहा ते सात गाड्या धावत असल्याचे सांगण्यात आले. यात पुण्यासाठी ४०० रुपये तर मुंबईसाठी ६०० रुपये भाडे आकारले जात आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बससह खासगी बसही काही महिने जागेवरच उभा होत्या, परंतु काही दिवसांपूर्वीच शासनाने काही निर्बंध घालून प्रवासी वाहतुकीला सूट दिली आहे. असे असले तरी प्रवाशांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. बीड शहरातून केवळ पुणे, मुंबई येथेच सर्वात जास्त खासगी बस धावतात. कल्याणला एखाद दुसरी बस धावत आहे. या बसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. यावर्षी तरी गणेशोत्सवात प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा ट्रॅव्हल्स मालकांना होती, परंतु ती सुद्धा पूर्ण झाली नाही.
--
असे आहे भाडे
पुणे, मुंबईला जाण्यासाठी पूर्वी सिटींग बस होत्या, परंतु त्या आता बंद झाल्या असून सर्व बस या स्लीपर झाल्या आहेत. पुण्यासाठी ४०० ते ४५० रुपये भाडे आकारले जाते तर मुंबईसाठी ६०० ते ६५० रुपये भाडे घेतले जात असल्याचे सांगण्यात आले. भाडेवाढ झाली नसल्याचा दावाही मालकांनी केला आहे.
---
गणेशोत्सवात प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. भाडेवाढ तर सोडाच आहे त्यातही कोणी येत नाही. आपल्या बीड शहरातून केवळ पुणे आणि मुंबईला थोडा प्रतिसाद मिळतो. कल्याणसाठी एखाद दुसरी बस धावते.
अजहर खान, ट्रॅव्हल्सधारक बीड