"स्मृतीदिनानिमित्त यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल,पण..."; पंकजा मुंडे यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 07:19 PM2024-06-01T19:19:23+5:302024-06-01T19:20:52+5:30
''४ जूनला विजयाचा मोठा ध्वज घेऊन मुंडे साहेबांच्या चरणी आपण अर्पण करूया.''
परळी ( बीड) : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा येत्या ३ जून रोजी स्मृतीदिन आहे तर ४ जून रोजी लोकसभा मतमोजणी आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ''लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दहावा स्मृतीदिनी ३ जून रोजी यावर्षी गोपीनाथ गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, त्यांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा'', असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.
सोशल मिडियावर एक व्हिडिओ प्रदर्शित करून पंकजा मुंडे यांनी राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांना विनंतीवजा आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, ''दरवर्षी 3 जून हा दिवस येतो तेव्हा आपल्या सगळ्यांना हृदयामध्ये कालवल्यासारखं होतं. मुंडे साहेबांसारखा नेता, आपलं उर्जास्थान, आपलं शक्तीस्थान, आपलं प्रेरणास्थान, आपलं श्रध्दास्थान आपल्यातून गेले ३ जून यादिवशी..माझा पिता हरवला, तुमचा नेता हरवला. माझ्या पित्यावर, माझ्या नेत्यावर तुम्ही प्रेम केलं. आज दहा वर्षे झाली त्यांना जावून पण तरीही तुम्ही न चुकता ३ जूनला गोपीनाथ गडावर येता. यावेळेस एक योगायोग आलेला आहे तो म्हणजे ३ जूनला मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ४ जूनला लोकसभेची काऊंटिंग आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, काऊंटिंग एजंटला ३ जून रोजी संध्याकाळीच बीडला जावे लागते. कारण पहाटे उठूनच त्यांना काऊंटिंगसाठी जावे लागते. मला ही अडचण पूर्णपणे लक्षात आहे. आपली सगळ्यांची इच्छा असून देखील आपल्या सर्वांना यायचं असून देखील ही तळमळ मी समजू शकते. म्हणून मीच तुमची ही अडचण दूर करायचं ठरवलं आहे.''
जिथे आहात तिथूनच पुण्यस्मरण करा
''मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते की, आपण जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा. मुंडे साहेबांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा आणि आपण यावर्षी गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल. ४ जूनला विजयाचा मोठा ध्वज घेऊन मुंडे साहेबांच्या चरणी आपण अर्पण करूया. यावेळेस आपण नाही आलात याविषयी मनामध्ये कुठलेही दुःख बाळगू नका. आपण पुढच्या वेळी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त खूप चांगले समाजोपयोगी कार्यक्रम करू, त्यावेळी फार मोठया संख्येने आपण उपस्थित रहा. दरवर्षीप्रमाणे आमचं कीर्तन असतं, भोजन असतं ते देखील आम्ही यावर्षी रद्द केलेलं आहे. आपली अडचण टाळावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.'' असे भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.