तासाभरासाठी २५ हजाराचे बिल घेऊनही गंभीर रुग्णास सोडेनात; लोटस हॉस्पिटलविरोधात तक्रार
By सोमनाथ खताळ | Published: August 25, 2022 06:57 PM2022-08-25T18:57:29+5:302022-08-25T18:58:02+5:30
बिल भरल्यानंतरही तासभर रेफर करणे थांबविले
बीड : शहरातील लोटस हॉस्पिटल पुन्हा एकदा वादात सापडले आहे. अपघातातील जखमीला प्रथमोपचारासाठी दाखल केले. परंतू प्रतिसाद मिळत नसल्याने आणि शस्त्रक्रियाचा खर्च जास्त सांगितल्याने या रूग्णाला औरंगाबादला रेफर करा, असे म्हणताच येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी रूग्णाच्या नातेवाईकांना अरेरावी करत उद्धव वागणूक दिली. तसेच बील भरल्यानंतरही एक तास रेफर केले नाही. जास्त बिल घेतले असा आरोप करत नातेवाईकांनी लोटसविरोधात जिल्हा शल्य चिकित्सकांकडे बुधवारी लेखी तक्रार केली आहे.
कारागृह निरीक्षक संजय कांबळे यांच्या मृत्यूनंतर हे लोटस हॉस्पिटल वादात सापडले होते. याची चौकशीही झाली होती. परंतू जिल्हाशल्य चिकित्सक बदलले आणि हे प्रकरणही मागे पडले. परंतू बुधवारी सकाळी शेख शरफोद्दीन (वय ५० रा.तेलगाव नाका, बीड) हे दुचाकीवरून बीडमधून घाटसावळीकडे जात होते. परंतू घोडका राजुरीजवळ त्यांचा अपघात झाला. लोकांनी उचलून त्यांना तात्काळ लोटस हॉस्पिटलमध्ये ठेवले. डाेक्याला गंभीर इजा असल्याने आणि शस्त्रक्रियाचा खर्च झेपत नसल्याने नातेवाईकांनी रूग्णाला औरंगाबादला रेफर करा, अशी विनंती केली. परंतू या हॉस्पिटलने उपचाराकडे तर दुर्लक्ष केलेच, परंतू अवघ्या तासाभरात २५ हजार रूपयांपेक्षा जास्त बील आकारले. तसेच बील भरल्यानंतरही तासभर रेफर केले नाही. तोपर्यंत रूग्ण जास्तच गंभीर झाला होता.
याबाबत विचारणा करण्यास गेल्यावर नातेवाईकांना अरेरावी करण्यासह उद्धट वागणूक दिली. हा सर्व प्रकार असह्य झाल्याने नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्याकडे धाव घेत लेखी तक्रार केली. आता यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. की मागच्यावेळी प्रमाणेच हे प्रकरण देखील मागे पडणार? असाही प्रश्न आहे. लोटस हॉस्पिटलचे डॉ.आशिष गर्जे यांना दोन वेळा संपर्क केला, परंतू त्यांनी फोन घेतला नाही.
तासाभरासाठी केले २५ हजारांचे बिल
शेख शरफोद्दीन हे माझे मामा होते. डोक्याला मार होता. शस्त्रक्रियेसह इतर उपचारासाठी ६ दिवसांत ३ लाख रूपये लागतील, असे सांगितल्याने आम्हाला रेफर करा, अशी विनंती केली. परंतू डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली. तसेच अवघ्या तासाभरात २५ हजार रूपयांपेक्षा जास्त बिल घेतले. बील भरल्यानंतरही तासभर रेफर केले नाही. त्यामुळे आम्ही सीएसकडे लेखी तक्रार केली.
- शेख सादेक पापामिया
समज दिली जाईल
लोटस हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी अरेरावी करण्यासह उद्धट वागणूक देऊन जास्तीचे बिल घेतल्याची तक्रार आली आहे. परंतू हे हॉस्पिटल महात्मा फुले योजनेत येत नाही. त्यामुळे त्यांनी किती बील घ्यावे, याला आपले नियंत्रण नाही. ते कोरोनाचे पेशंट असते तर चौकशी करता आली असते. परंतू उद्धट वागणूकीबद्दल समज दिली जाईल.
- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड