अखेर प्रशासन जागे झाले; सलग दुसऱ्या दिवशी प्रेत तहसील कार्यालयात ठेवल्याने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 02:33 PM2020-08-28T14:33:15+5:302020-08-28T14:48:54+5:30
शहरातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न आज दुसऱ्या दिवशीही ऐरणीवर आला.
धारूर : येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर आज सलग दुसऱ्या दिवशीही प्रेतयात्रा तहसील कार्यालयात थेट तहसीलदारांच्या दालनासमोर नेण्यात आल्याची घटना घडली. या प्रकाराने हादरलेल्या प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली आहे.
शहरातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न आज दुसऱ्या दिवशीही ऐरणीवर आला. काल दि.२७ गुरुवार रोजी तहसील कार्यालयात प्रेतयात्रा नेल्यानंतर नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी आंदोलकांची समजूत काढून प्रकरण शांत केले. यावेळी येत्या ३१ अॉगस्ट पर्यंत स्मशानभूमीचा रस्ता मोकळा करुन देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू आज पुन्हा एक व्यक्ती मृत झाल्यानंतर स्मशानभूमीकडे जाण्याच्या रस्त्याचा प्रश्न पुढे आला. यामुळे संतापलेल्या समाज बांधवांनी सलग दुसऱ्या दिवशी प्रेतयात्रा तहसील कार्यालयात नेली. आज प्रेत थेट तहसीलदारांच्या दालनासमोरच ठेवण्यात आले. यामुळे प्रशासन चांगलेच हादरले.
आक्रमक समाज बांधवानी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची जोरदार मागणी करत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी पोलिसांना पाचारण केले. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस पोलिस ताफ्यासह तत्काळ तहसील कार्यालयात पोहोचल्या. यानंतर समाज बांधव, तहसील व पोलीस प्रशासन यांच्यात रस्त्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. शेवटचे वृत्त आले तेव्हा स्मशानभूमी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती.
इतर महत्वाच्या बातम्या :
- अंबाजोगाईत कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून
- मृत्युनंतर वृद्धाचा अहवाल 'पॉझिटिव्ह'; अंत्यविधीत उपस्थित १५० ग्रामस्थांची चिंता वाढली
- अंबाजोगाईत ३० वर्षीय महिलेवर बलात्कार