अखेर आष्टी प्रशासनाला कोरोना बाधितांना शोधण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:33+5:302021-07-14T04:38:33+5:30

लोकमत इम्पॅक्ट बीड : चुकीचे मोबाईल क्रमांक, मोबाईल बंद करून ठेवलेल्या कोरोना बाधित रूग्णांना शोधण्यात आष्टी तालुका प्रशासनाला अखेर ...

Eventually the Ashti administration succeeds in finding the Corona victims | अखेर आष्टी प्रशासनाला कोरोना बाधितांना शोधण्यात यश

अखेर आष्टी प्रशासनाला कोरोना बाधितांना शोधण्यात यश

Next

लोकमत इम्पॅक्ट

बीड : चुकीचे मोबाईल क्रमांक, मोबाईल बंद करून ठेवलेल्या कोरोना बाधित रूग्णांना शोधण्यात आष्टी तालुका प्रशासनाला अखेर यश आले आहे. पॉझिटिव्ह आल्यास केवळ कोविड सेंटरमध्ये १० दिवस अडकून पडण्याच्या भीतीने रूग्णांनी चुकीचा मोबाईल क्रमांक दिल्याचे सांगण्यात आले आहे. शोधलेले सर्व रूग्ण सध्या आष्टीतील सीसीसी, रूग्णालयांसह अहमदनगरच्या खासगी रूग्णालयात दाखल असल्याचे सांगण्यात आले. आता प्रशासनाची धावपळ थांबली असून यापुढे काळजी घेतली जात आहे.

जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोना बाधित रूग्ण सध्या आष्टी तालुक्यात आढळत आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी स्वत: भेटी देण्यासह यंत्रणा कामाला लावली होती. यात त्यांना बंदी असतानाही रूग्ण होम आयसोलेट राहत असल्याचे दिसले. यावर त्यांनी सर्वांना सूचना करून त्यांना सीसीसी व रूग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु संपर्क करताना जवळपास ५८ रूग्णांनी चुकीचा मोबाईल क्रमांक दिल्याचे उघड झाले. त्यांना शोधण्यासाठी प्रशासनाची चार दिवसांपासून धावपळ सुरू होती. अखेर ग्रामसेवक, आशाताई यांच्या मदतीने या रूग्णांना शोधण्यात रविवारी रात्री उशिरा यश आले. हे सर्व रूग्ण सध्या आष्टीतील सीसीसी, रूग्णालयांमध्ये दाखल आहेत. तसेच काही रूग्ण हे अहमदनगर जिल्ह्यातील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. हे रूग्ण आयसोलेटे असल्याचे समजताच प्रशासनाने मोकळा श्वास घेतला आहे. तसेच यापुढे असे घडणार नाही, या दृष्टीने उपाययोजना व काळजी घेतली जात असल्याचे डॉ. आर. बी. पवार यांनी सांगितले.

त्रास नसताना सीसीसीमध्ये का थांबावे?

संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने प्रशासनाने कोरोना बाधितांना होम आयसोलेशन देणे बंद केले आहे. त्यामुळे प्रत्येकाला सीसीसी अथवा रूग्णालयात दाखल केले जाते. काही रूग्णांना त्रास नसतानाही ते पॉझिटिव्ह असतात. चाचणी करतानाच ते सीसीसीत राहण्याच्या भीतीने चुकीचा मोबाईल क्रमांक देऊन होम आयसोलेट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे. त्रास नसल्याने आम्ही का थांबावे, असा प्रश्न काही रूग्ण उपस्थित करत आहेत.

--

आष्टी तालुक्यातील मोबाईल बंद असलेले, चुकीचा मोबाईल क्रमांक दिलेल्या सर्वच कोरोना बाधित रूग्णांना शोधण्यात यश आले आहे. सर्वच रूग्ण आष्टीतील सीसीसी, रूग्णालयात तसेच काही रूग्ण अहमदनगरच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. आता तालुक्यात एकही रूग्ण होम आयसोलेट नाही.

डॉ. नितीन मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, आष्टी

---

आष्टीतील कोरोना रूग्णसंख्या कमी व्हावी, तसेच उपाययोजना व नियोजनासाठी विशेष अधिकारी नियुक्त केले आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व मी स्वत: या तालुक्यावर लक्ष ठेवून आहोत. यापुढे हलगर्जी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. हलगर्जी झाल्याचे दिसताच कारवाई केली जाईल.

डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड

Web Title: Eventually the Ashti administration succeeds in finding the Corona victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.