अखेर 'त्या' अल्पवयीन मुलीचा शोध लागला; एक महिन्यानंतर पोलिसांनी मुखेड येथून घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:18 PM2021-05-31T16:18:21+5:302021-05-31T16:19:52+5:30
माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील १७ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. २५ एप्रिल रोजी तिच्या पालकांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
दिंद्रुड ( बीड ) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत एका अल्पवयीन मुलीची अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी २५ एप्रिल रोजी दिली होती. तब्बल एक महिना सहा दिवसानंतर त्या मुलीचा शोध घेण्यात दिंद्रुड पोलिसांना यश आले आहे. त्या अल्पवयीन मुलीस दिंद्रुड पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथून ताब्यात घेतले आहे. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी ४० हजार रुपये मागितल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील १७ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. २५ एप्रिल रोजी तिच्या पालकांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर शनिवारी मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी ४० हजार मागितल्याची तक्रार वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. पोलिसांनी हे आरोप नाकारत मुलीचा शोध सुरु असल्याचे सांगितले होते. यानंतर रविवारी पोलिसांनी फोन ट्रेसिंगच्या माध्यमातून मुलीचा माग काढला. मुलगी नांदेड तालुक्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक आणि मुलीचे नातेवाईक नांदेडला रवाना झाले होते. यानंतर मुखेड तालुक्यात मुलीचा शोध लागला. याप्रकरणी स्थानिक पोलीस स्थानकात पुढील कारवाई सुरु आहे. यानंतर मुलीला दिंद्रुड पोलीस स्थानकात आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. आरोपी अभय सोनकांबळे ( २२ ) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुलीच्या वडिलांनी केली होती पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील १७ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. २५ एप्रिल रोजी तिच्या पालकांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांचा मध्यस्थ हनुमान याने मुलीचा तपास लावून परत आणायचे असेल तर साहेबाला ४० हजार रुपये खर्च द्यावा लागेल, असे सांगितले. जुळवाजुळव करून मुलीच्या वडिलांनी १५ हजार रुपये हनुमानकडे दिले. त्यानंतर चार-पाच दिवस झाले तरी तपास लागला नव्हता. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी ठाण्यात चौकशी केली. परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मध्यस्थी हनुमानला विचारणा केली असता, राहिलेले २५ हजार रुपये दिल्याशिवाय तपास लागू शकत नाही, असे त्याने सांगितले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून याबाबत तक्रार दाखल केली. बेपत्ता मुलीचा तपास लावावा आणि पोलीस मध्यस्थ हनुमान व स.पो.नि गव्हाणकर यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यात केली होती.