बीडमध्ये दररोज बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:46 PM2019-08-02T23:46:01+5:302019-08-02T23:47:01+5:30
बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षात ० ते ५ या वयोगटातील तब्बल ८८८ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षात ० ते ५ या वयोगटातील तब्बल ८८८ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरासरीनुसार प्रत्येक दिवसाला एक बालमृत्यू होत आहे. शासनस्तरावरून योजना राबविल्या जातात. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्याची पुरेपुर अंमलबजावणी होत नसल्याने या योजना कागदावरच राहत आहेत. या निमित्ताने आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आरोग्य विभागाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना, जननी सुरक्षा, जननी शिशू सुरक्षा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आदींचा समावेश आहे. तसेच कुपोषण रोखण्यासाठी मोफत आहारही दिला जातो असे असले तरी बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे. २०१७-१८ मध्ये जन्मल्यानंतर ० ते १ वयोगटात ३६३ तर २०१८-१९ मध्ये ३५६ बालकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ० ते ५ वयोगटात २०१७-१८ मध्ये ८९ तर २०१८-१९ मध्ये ८० बालकांचा जीव गेला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे जंतूसंसर्ग आणि न्यूमोनियामुळे झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, गरोदरपणात योग्य काळजी न घेणे, डॉक्टरांचा सल्ला, वेळच्यावेळी तपासणी न केल्यामुळे संतुलीत आहार न घेतल्यामुळे मातेची प्रकृती खालावते. याचा परिणाम गर्भावर होतो. यासह रूग्णालयातील घाणीचे साम्राज्य व इतर कारणांमुळे बालकाला जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) होतो. यामुळेच बालकांचा जीव जास्त प्रमाणात जात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. याासाठी राबविण्यात येणारी जनजागृती मोहीम प्रभावी करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
योजना राबवण्यासाठी मनुष्यबळ अपुरे
शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जातात. याचा उद्देशही चांगला आहे.
मात्र, या योजना राबविण्यासाठी आणि त्यांची जनजागृती करून लाभ देण्यासाठी आरोग्य विभागाकडे यंत्रणा खूपच अपुरी आहे.
याचा परिणामही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. वर्ग १ ते सेवकांपर्यंतची पदे रिक्त असल्याने अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एका वर्षांच्या आत ४४३ मृत्यू
जंतूसंसर्ग, गुदमरणे, फुफ्फुसाचा आजार, जुलाब, ताप, गोवर आदी कारणांमुळे अवघ्या ० ते १ वर्षे वयोगटात तब्बल ७१९ बालमृत्यू झाले आहेत.
तसेच ० ते ५ वर्षे वयोगटात १६९ बालमृत्यू झाले आहेत. ही आकडेवारी मागील दोन वर्षातील आहे.
बीड जिल्ह्यामध्ये ० ते १ वर्षे वयोगटात दोन वर्षात ७१९ तर १ ते ५ वर्षे वयोगटात १६९ बालमृत्यू झाले आहेत. शासन योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. दोन वर्षांमध्ये ८८८ बालमृत्यूची नोंद झालेली आहे. सर्वांच्या प्रयत्नातून हे प्रमाण कमी करण्यावर भर देणार.
- डॉ.संजय कदम, माता व बालसंगोपन अधिकारी, बीड