सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 06:28 PM2024-11-09T18:28:16+5:302024-11-09T18:30:26+5:30

बीड जिल्ह्यात अनेक जण त्रस्त आहेत, पण कोणी बोलत नाही. हे कुठे तरी थांबले पाहिजे.

Everyone should come together and end the bullying in Parli, defeat the power grabbers, Sharad Pawar targets Dhananjay Munde | सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल

सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल

परळी: ‘बऱ्याच दिवसांनी परळीत आलोय. आज महाराष्ट्राला वीज देण्याचं काम परळीनं केलं. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी परळीचं विद्युत केंद्र महत्त्वाचं आहे. पण परळीत गुंडगिरी वाढली. इथं धंदा करणे अवघड आहे. एका प्रकारची गुंडगिरी आणि दादागिरी सुरू आहे,’ असं म्हणत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनीधनंजय मुंडेंवर निशाणा साधला. बीड जिल्ह्यात अनेक जण त्रस्त आहेत, पण कोणी बोलत नाही. हे कुठे तरी थांबले पाहिजे. काहींच्या डोक्यात लवकर सत्ता गेली त्यांचा पराभव करा, असे आवाहन पवार यांनी केले.

परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे व महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ शनिवारी दुपारी येथील मोंढा मैदानावर शरद पवार यांची जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेत प्रसंगी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे , खासदार रजनी पाटील, फौजिया खान, उमेदवार राजेसाहेब देशमुख व राजेश देशमुख, राजेभाऊ फड फुलचंद कराड, सुदामती गुट्टे ,ऍड,माधव जाधव ,जीवनराव देशमुख, प्रभाकर वाघमोडे ,उत्तम माने अजय बुरांडे, डॉक्टर नरेंद्र काळे ,व्यंकटराव चामनर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनीफ उर्फबहादुर , तालुकाध्यक्ष अनिल मुंडे यांच्या इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती जाणवली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यामध्ये तिघा जणांचा समावेश होता हे तिघेजण कोण हे सांगायची गरज नाही. परंतु पुरोगामी महाराष्ट्रात बीड जिल्हा आदर्श होता. ज्यांनी पक्ष फोडला व समाजा समाजामध्ये अंतर करण्याची भूमिका मांडली. बीड जिल्ह्याचा आदर्श पणा उद्ध्वस्त करण्याचे ज्यांनी काम केले त्यांना पराभूत  करावे. काही वर्षापूर्वी पंडित अण्णा मुंडे हे धनंजय मुंडे  यांना घेऊन माझ्याकडे आले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत सुसंवाद झाला होता व धनंजय मुंडे यांच्याकडे लक्ष ठेवा असे म्हणाले होते. त्यामुळे आपण धनंजय मुंडे यांना प्रोत्साहन दिले, विधान परिषद सदस्य केले, आमदार केले, विरोधी पक्षनेते केले, मंत्री केले, जे जे करता येईल ते ते केले. परंतु अलीकडे परळीला काय झाले हे मला कळत नाही, व्यवसाय करणे हे दुकानदारांना अवघड झाले आहे .येथील व्यवसायाचे नियंत्रण काही शक्तीकडे  गेले आहे. लोक त्रस्त झाले आहेत. लोकांनी एकत्रित येऊन गुंडगिरी संपवावी असे शरद पवार म्हणाले. 

बीड लोकसभा निवडणुकीत बजरंग बप्पा सोनवणे यांना निवडून दिल्याचा आपल्याला आनंद झाल्याचे ही शरद पवार यांनी सांगितले  त्यांच्या  सोबत रजनीताई पाटील , फौजिया खान व मी स्वतः आहे  व पक्षाची साथ आहे आहे. यावेळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील रेणापूरचे आमदार स्वर्गीय रघुनाथराव मुंडे यांची  आठवण शरद पवार यांनी आपल्या भाषणातून काढली. त्यांचा अपघाती  मृत्यू कशामुळे झाला असा उल्लेख ही त्यांनी केला तसेच परळीच्या माजी नगराध्यक्ष राधाबाई बियाणी यांचेही सामाजिक कार्य चांगले असल्याचे उदगार काढले.  जाहीर सभेत खासदार बजरंग सोनवणे उमेदवार राजेसाहेब देशमुख, सुनील गुट्टे यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. यावेळी खा, रजनी पाटील ,फौजिया खान,  राजेश देशमुख, प्रभाकर वाघमोडे,अजय बुरांडे, उत्तम माने यांच्यासह इतरांची भाषणे झाली. या सभेत राम कृष्ण हरी वाजवा तुतारी, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार अशा घोषणा देण्यात आल्या या सभेस परळी मतदारसंघातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

Web Title: Everyone should come together and end the bullying in Parli, defeat the power grabbers, Sharad Pawar targets Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.