प्रत्येकाने शांतता दुताची भूमिका निभवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 11:59 PM2019-11-08T23:59:37+5:302019-11-09T00:02:11+5:30
अयोध्या प्रकरणी लागणारा आगामी निकाल हा संपूर्णत: न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि या निकालाचा प्रत्येक भारतीयाने, बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सन्मान राखावा. यासाठी समाजातील प्रत्येकाने शांतता दुताची भूमिका पार पाडावी. जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन दक्ष व सतर्क आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.
बीड : अयोध्या प्रकरणी लागणारा आगामी निकाल हा संपूर्णत: न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि या निकालाचा प्रत्येक भारतीयाने, बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सन्मान राखावा. यासाठी समाजातील प्रत्येकाने शांतता दुताची भूमिका पार पाडावी. जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन दक्ष व सतर्क आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव, आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे आणि केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, विविध राजकीय पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालाचा सर्वांनी आदर करावा. निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी शांतता, सुव्यवस्था व सामाजिक सलोखा अबाधित राखावा. मानवता हाच खरा धर्म असून एकमेकांना सहकार्य, प्रेम ही खरी या धर्माची शिकवण आहे. सर्वांनी त्याचे पालन करावे. समाजकंटक आणि अपप्रवृत्ती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करु नयेत. असे मजकूर सुजाण नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाच्या किंवा सायबर सेलच्या निदर्शनास आणावेत. शांतता समितीचे सदस्य शांततादूत आहेत. त्यांनी समाजापर्यंत, युवा पिढी, महिलांपर्यंत हा संदेश पोहोचवाव असे मत जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील पाण्डेय यांनी यावेळी केले. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व धर्मीय नागरिकांची उपस्थिती होती.
निकाल आदरपूर्वक स्वीकारावा : पोद्दार
जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, मा. सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्या प्रकरणावरील आगामी निकाल हा संपूर्ण न्यायिक प्रक्रियेतून येणारा निकाल असून तो कोणतीही जात, धर्म, पंथ यांच्याशी जोडलेला नाही. त्यामुळे सर्वांनी तो आदरपूर्वक स्वीकारावा.
पोलीस प्रशासन नि:पक्षपाती असल्याबाबत खात्री बाळगा. पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करु नये. आक्षेपार्ह मजकूर निदर्शनास आल्यास पोलीस स्टेशन, सायबर सेल यांच्या निदर्शनास आणावेत.
पोलीस प्रशासन सामाजिक सुरक्षततेसाठी कटिबध्द असून हुल्लडबाजी करुन शांतता बिघडविण्याचा प्रयत्न झाल्यास अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यात १४ ठिकाणी नाकाबंदी
अयोध्या प्रकरणी निकालासंदर्भात पोलीस प्रशासनाने योग्या ती कार्यवाही सुरु केली आहे. दरम्यान कृती आराखड्याची माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, यासंदर्भात जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर विविध बैठका घेण्यात येत आहेत. सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल २४ तास कार्यरत आहे. पथसंचलन, जमावबंदी आदेश, १४ ठिकाणी नाकाबंदी, मोहल्ला बैठका, कोबिंग आॅपरेशन आदि आवश्यक खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत.