Parali Vidhan Sabha Election 2024: ईव्हीएम मशीनचा क्रम चुकला; महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंचा पारा चढला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 12:26 PM2024-11-20T12:26:40+5:302024-11-20T12:28:34+5:30
माहिती मिळताच महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी तत्काळ दिंद्रुड येथे मतदान केंद्रावर धाव घेत अधिकाऱ्याला विचारला जाब
बीड: जिल्ह्यातील माजलगावच्या दिंद्रुड येथे मतदान बूथ केंद्र क्रमांक 199 मध्ये ईव्हीएम मशीन ठेवताना चुकलेल्या क्रमामुळे मतदान प्रतिनिधीने आक्षेप घेतला. याची माहिती मिळताच महायुतीचे उमेदवार तथा आमदार प्रकाश सोळंके यांनी मतदान केंद्रांवर धाव घेतली. येथे निवडणूक अधिकाऱ्याला जाब विचारत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोळंके यांनी माहिती दिली. त्यानंतर ईव्हीएम मशीनचा क्रम दुरुस्त करण्यात आल्याची माहिती आहे.
मतदान प्रतिनिधी धैर्यशील ठोंबरे यांनी सकाळी मतदान करते वेळी ईव्हीएम मशीनचा क्रम ३, २, १ असा उलटा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले, मात्र, अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. याची माहिती मिळताच महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी तत्काळ दिंद्रुड येथे मतदान केंद्रावर धाव घेतली. एकूण सहा बूथ असताना एकाच बुथवर हा क्रमांक कसा चुकला याबाबत आमदार सोळंके यांनी अधिकाऱ्याला जाब विचारला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे याची माहिती दिली. त्यानंतर ईव्हीएम मशीनचा क्रम दुरुस्त करण्यात आला.
मतदारसंघात ३४ उमेदवार
माजलगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ३४ उमेदवार आहेत. यामुळे तीन ईव्हीएम मशीन लावण्यात आल्या आहेत. यावर आमदार सोळंके यांचा क्रमांक एक आहे. त्यानंतर इतर उमेदवारांचे क्रमांक आहेत. मात्र, मशीन ठेवण्याचा क्रम चुकल्याने गोंधळ उडाला.