फोडलेल्या गाडीवर माजी मंत्र्यांचं स्पष्टीकरण; विनायक मेटेंचीही सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 12:35 PM2023-10-29T12:35:36+5:302023-10-29T12:36:20+5:30
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मोहिमाता देवीची यात्रा सुरू आहे
बीड - शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या गाडीवर मादळमोही येथे शनिवारी सायंकाळी मराठा आंदोलकांनी दगडफेक केली. माजीमंत्री पंडित हे मोहिमाता देवीच्या दर्शनसाठी येथे आले असता हा प्रकार घडला. यासंदर्भात आता बदामराव पंडित यांनी स्पष्टीकरण दिलं असून मी गाडीत नसताना हा प्रकार घडला, पण गाडीवर एका लहान मुलाकडून दगड मारण्यात आला होता. मी विनायक मेटेंसोबत महाराष्ट्र दौरा केला असून माझा मराठा आरक्षणाला कायमच पाठिंबा राहिला आहे, असेही पंडित यांनी सांगितले.
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मोहिमाता देवीची यात्रा सुरू आहे. त्यानिमित्त माजीमंत्री बदामराव पंडित मोजक्या कार्यकर्त्यासोबत मोहिमाता देवीच्या दर्शनाला सायंकाळी आले. मंदिर परिसरात गाडी लावून माजीमंत्री पंडित आणि कार्यकर्ते दर्शनासाठी गेले. दरम्यान, त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीच्या डाव्या बाजुच्या पाठिमागील काचेवर लहान मुलाने दगड मारला. त्यामुळे, गाडीचा काच फुटला आहे. मात्र, याबाबत स्वत: माजी मंत्री बदामराव पंडित यांनी घडलेली घटना सांगितली. तसेच, मी गाडीत नसताना ही घटना घडली, ड्रायव्हरकडे गाडी होती, असेही त्यांनी सांगितले.
विनायक मेटेंची काढली आठवण
मी मादळमोही येथे आज यात्रा आहे. त्यामुळे मोहिमातेच्या दर्शनासाठी मी तेथे गेलो होतो, याठिकाणी मोठी गर्दी असल्याने १ किमी पायी गेलो. मला आजपर्यंत कुणीही कुठंही अडवलं नाही. मात्र, गैरसमजातून मी गाडीत नसतना ती गाडी अडवण्यात आली होती. त्यावेळी, गाडीत पेशंट होता, तेथील युवकांना ते लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडी सोडून दिली. मात्र, एका लहान मुलाने तो दगड भिरकवला होता, ज्यात काच फुटली, असे पंडित यांनी सांगितले. तसेच, मी दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्यासमवेत महाराष्ट्रभर फिरलो आहे, मराठा आरक्षणासाठी आम्ही मोठे प्रयत्न केले आहेत, माझा कायमच मराठा आरक्षणास पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले.