शिक्षणक्षेत्रात खळबळ; शिक्षिकेचा शाळेतच आत्महत्येचा प्रयत्न, मुख्याध्यापकासोबत वादाची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 04:18 PM2021-12-04T16:18:01+5:302021-12-04T16:19:19+5:30
मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांच्यात मागील तीन वर्षांपासून वाद सुरु आहेत.
माजलगाव ( बीड ) : तालुक्यातील राजेवाडी येथील मुख्याध्यापक व शिक्षिकेचा वाद चांगलाच चिघळला आहे. आज संगिता राठोड या शिक्षिकेने शाळेच्या नव्या इमारतीत विषप्राशन केल्याने खळबळ उडाली.
राजेवाडी येथे जिल्हा परिषदेची चौथी पर्यंत शाळा भरत असून या ठिकाणी आठ शिक्षक काम करतात. या शिक्षकांपैकी मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड व शिक्षिका संगिता राठोड यांच्यात मागील 2-3 वर्षापासून वाद आहे. हा त्यांचा वाद गावक-यांनी अनेक वेळा मिटवला. मात्र, अद्यापही सुरु आहे. मागील महिन्यात 26 नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापक जिंकलवाड आणि शिक्षिका राठोड या दोघांत पुन्हा वाद झाले. यामुळे गावकऱ्यांनी शाळेच्या मुख्य गेटलाच कुलुप लावले. जोपर्यंत दोघांपैकी एकाची बदली होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलुप उघडण्यात येणार नसल्याचा ठाम निर्णय ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना बोलून दाखवला.
गावकऱ्यांच्या तक्रारीवरून शिक्षणाधिकाऱी यांनी दोघांना सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वीच या शिक्षिकेने आज दुपारी बारा वाजता शाळेच्या नवीन इमारतीत विषारी द्रव्य प्राशनकरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर माजलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुख्याध्यापकांना बडतर्फ करा
मुख्याध्यापकाच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप संगिता राठोड यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच संबंधित मुख्याध्यापक जिंकलवाड यांना तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
मला गोवण्यात येत आहे
हाप्रकार नियोजनपूर्वक आहे. शिक्षिका व त्यांच्या नातेवाईकांकडुन मला गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड यांनी केला आहे.