शिक्षकांच्या पगारातील २६ लाखांची कपात गायब, तत्कालीन मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 07:44 PM2023-03-24T19:44:25+5:302023-03-24T19:46:18+5:30
अंजनडोह केंद्राच्या तत्कालीन मुख्याध्यापकावर अखेर अपहाराचा गुन्हा दाखल
धारूर ( बीड) : अंजनडोह केंद्राचे तत्कालीन मुख्यध्यापक रमेश विष्णूपंत नखातेने शिक्षकांच्या पगारातील एलआयसी, इन्कम टॅक्स व इतर कपातीची रक्कम गायब केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने एक समिती नेमली होती. चौकशी अंती मुख्याध्यापक नखाते विरुद्ध 26 लाख 47 हजार 061 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी धारूर पोलीस स्टेशनमध्ये गटशिक्षणाधीकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या माजलगाव तालुक्यातील शिंदे वस्ती तांड्यावर कार्यरत असणारे सहशिक्षक रमेश नखाते हे मागच्या काही महिन्यापासून चर्चेत आहेत. त्यांनी धारूर तालुक्यात अंजनडोह येथे प्रभारी केंद्रीय मुख्याध्यापक असताना शिक्षकांच्या एलआयसी तसेच वेगवेगळ्या विमा पॉलिसी, आयकर, पतसंस्थेच्या कपातीत 26 लाख 47 हजार रुपयांचा अपहार केला होता. सदरील प्रकार तीन वर्षापूर्वी उघडकीस आला होता. यावर शिक्षण विभाग कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत होत. परंतु शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर रमेश नखातेस तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.
त्यानंतर नखातेस माजलगाव तालुक्यातील शिंदे वस्ती येथील तांड्यावरील शाळेत सहशिक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली. मात्र त्यांनी अपहाराची रक्कम जमा केली नव्हती. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशी सुरू होती. यात पाच लाख ऐंशी हजार रुपयांची रक्कम भरण्यात आली होती. उर्वरित 20 लाख 67 हजार रुपये रक्कम भरण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मुदत देऊन ही नखाते यांनी रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. यामुळे शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. यावरून आयुक्तांनी तात्काळ कारवाईचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल.
दरम्यान, 13 मार्च रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली होती. यावेळी रमेश नखाते गैरहजर राहिले. त्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात आज रमेश नखाते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकाराने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.