राजकीय वर्तुळात खळबळ; 'वंचित'च्या ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एमपीडीए अंर्तगत स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 03:17 PM2022-01-10T15:17:00+5:302022-01-10T15:18:53+5:30
VBA Shivraj Bangar: प्रदेशाध्यक्षांवर झोपडपट्टी दादा कायद्यानुसार कारवाई, बीड पोलिसांनी प्रा. शिवराज बांगर यांना मुंबईत घेतले ताब्यात
बीड : वंचित बहुजन आघाडीचे ( Vanchit Bahujan Aaghadi ) माजी जिल्हाध्यक्ष व ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर ( Shivaraj Bangar ) यांच्यावर एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) नुसार कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर, ठाणे व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शनिवारी त्यांना मुंबईतील बेलापूर येथे एका लॉजमधून ताब्यात घेतले. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रा. शिवराज बांगर यांच्यावर एकूण सात गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव शिवाजीनगर ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी हा प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना सादर केला. त्यांनी ३१ डिसेंबर २०२१ रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली. तेव्हापासून प्रा. बांगर यांचा शोध सुरू होता. अखेर ते मुंबईतील बेलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक हनुमंत खेडकर, हवालदार रामदास तांदळे यांचे पथक रवाना झाले. तांत्रिक तपासाआधारे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बेलापूर येथे एका लॉजमधून प्रा. शिवराज बांगर यांना ताब्यात घेतले. त्यांना सायंकाळी बीडला आणले. त्यानंतर औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
चला, निराेप घेतोय सगळ्यांचा...!
दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याच दिवशी प्रा. बांगर यांनी सोशल मीडियावर 'चला निरोप घेतोय सगळ्यांचा... आता सहन होत नाही...' अशी पोस्ट करून ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता. शोध घेऊनही ते पोलिसांना सापडत नव्हते.