खळबळजनक ! बीडच्या नगराध्यक्षांवर होणार अपात्रतेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 03:01 PM2021-02-08T15:01:36+5:302021-02-08T15:02:30+5:30
पद रिक्त नसतानाही प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करणे प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश.
बीड : बीड नगरपालिकेेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना उपअभियंता दंडेप्रकरण चांगलेच भोवले आहे. अमर नाईकवाडेंनी केलेल्या तक्रारीवर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत व सा. बां. औरंगाबादच्या मुख्य अभियंत्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यास निर्देशित केले आहे.
बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी मिलिंद सावंत यांच्याकडे २ फेब्रुवारी ते १३ मे, २०१९ पर्यंत देण्यात आल्यानंतरही त्यांनी २७ जून, २०१९ रोजी नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीने सा. बां. औरंगाबादचे मुख्य अभियंता यांच्याकडे विनंती करून एस. एस. दंडे यांना सोनपेठवरून विविध रस्ते विकास कामासाठी बीडमधील उपअभियंतापदाचा अतिरिक्त पदभार देण्यासाठी विनंती केली. हे पद रिक्त नसतानाही प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करणे चूक आहे. हाच धागा पकडून अमर नाईकवाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.
याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली. या सर्व बाबींचा आढावा घेत, तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुनावणी घेत आदेश दिले. यात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व मुख्य अभियंता यांना रिक्त पद नसतानाही प्रतिनियुक्तीवर नेमणूक करता येत नसल्याचे सांगितले, तसेच २७ जून २०१९ रोजीचे पत्र बनावट आहे. नाईकवाडेंनी वादातील पत्र मागविले, तेव्हा ते नाही असे सांगितले, परंतु सुनावणीदरम्यान ते सादर केले. यासारख्या मुद्द्यांवर ठपका ठेवत त्यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर अपात्रतेची कारवाई, तर तत्कालीन मुख्याधिकारी सावंत व मुख्य अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वादातील प्रत उपलब्ध नाही, असे सांगणाऱ्या कर्मचाऱ्यावरही विद्यमान मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निर्णय झाल्याने समाधानी
सोनपेठ येथील वादग्रस्त उपअभियंता दंडे यांना बीडमध्ये खोट्या स्वाक्षरी व बनावट पत्र तयार करून आणण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, तत्कालीन मुख्याधिकारी व सा. बां. औरंगाबादचे मुख्य अभियंता याला जबाबदार होते. त्यामुळेच मी पुराव्यानिशी तक्रार केली होती. यावर निर्णय झाल्याने समाधानी आहे.
- अमर नाईकवाडे, नगरसेवक तथा तक्रारदार बीड
राजकीय दबावापोटी माझे नाव आले
तक्रारदाराने माझे नाव तक्रारीतून वगळले होते; परंतु पालकमंत्री व आमदारांच्या राजकीय दबावापोटी माझे नाव गोवण्यात आले. शहरात मोठी कामे सुरू आहेत. त्यासाठी एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला आणणे चुकीचे नाही. अशा किरकोळ प्रकरणात थेट अपात्रतेची कारवाई करता येत नाही. केवळ राजकीय विरोध म्हणून असे केले जात आहे.
- डॉ. भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्ष, बीड