वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:33 AM2021-05-13T04:33:55+5:302021-05-13T04:33:55+5:30
‘मार्ड’ची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी मार्ड ...
‘मार्ड’ची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी मार्ड या संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदनही अधिष्ठातांना दिले आहे.
राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच निवासी वैद्यकीय डॉक्टर्स गेल्या १४ महिन्यांपासून स्वतःच्या पदव्युत्तर विद्याशाखेचा सराव तसेच अभ्यास सोडून कोरोनाच्या आपत्ती लढ्यात सहभागी होऊन कार्यरत आहेत. निवासी डॉक्टरांनी तर अहोरात्र सेवा सुरूच ठेवली आहे. प्रशासन निवासी डॉक्टरांकडून इतके काम करून घेत आहे. तरीही निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच करत आहे. प्रशासनाची भूमिका खेदजनक असल्याने विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने करूनही दुर्लक्षच होत आहे. निवासी डॉक्टरांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना सन २०१९-२० व २०२०-२०२१ या कालावधीत आरोग्य विद्यापीठ यांच्यावतीने वैद्यकीय अभ्यासक्रमातील शिक्षण व सरावच न मिळाल्याने त्या दोन शैक्षणिक वर्षांसाठीचे विद्यापीठाचे असलेले शैक्षणिक शुल्क माफ करून विद्यार्थ्यांवर असलेला आर्थिक व मानसिक ताण घालवून त्यांना कर्तव्यासाठी पोषक वातावरण तयार करून प्रोत्साहित करावे, अशी मागणी अंबाजोगाई मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुमित साबळे, सचिव डॉ. विद्या लावंड, डॉ. केदार कुटे यांनी केली आहे.