कार्यकारी अभियंत्यांचा प्रताप; बिले काढण्यासाठी टक्केवारीने वसुली, कार्यालयातच स्वीकारल्या नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 12:14 PM2022-01-14T12:14:57+5:302022-01-14T12:15:32+5:30
सार्वजनिक बांधकाम विभाग हा कायमच वादात असतो. येथे पैसे घेतल्याशिवाय एकही काम होत नाही, अशी कायम ओरड असते.
- सोमनाथ खताळ
बीड : येथील बांधकाम विभागातील अधिकारी बिले काढण्यासाठी टक्केवारीने पैसे घेत असल्याचा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. यात कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम हाळीकर हे १ टक्क्याने पैसे मागत आहेत. तसेच नोटांचे बंडल खिशात घालत आहेत. यात हाळीकर यांनी अगोदर १० लाख रुपयांच्या बिलावर स्वाक्षऱ्या केल्याचे १० हजार रुपयांचीही मागणी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बांधकाम विभागातील ‘टक्केवारी’ने ‘वसुली’ करण्याचा प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग हा कायमच वादात असतो. येथे पैसे घेतल्याशिवाय एकही काम होत नाही, अशी कायम ओरड असते. तसेच बोगस कामे दाखविणे, रस्त्यांची कामे निकृष्ट असतानाही टक्केवारीने पैसे घेऊन कंत्राटदारांची बिले काढल्याच्या तक्रारी आहेत. काही दिवसांपूर्वीच याच कार्यालयातील एक अभियंता लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. आता पुन्हा वादग्रस्त असलेले कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम हाळीकर हे देखील अडचणीत आले आहेत. एका कंत्राटदाराकडून रस्ता कामांचे बिल काढण्यासाठी पैसे स्वीकारले आहेत. तर आगोदर काढलेल्या १० लाख रुपयांच्या बिलात १ टक्क्याने १० हजार रुपये मागितले आहेत. येतानाच पैसे घेऊन येत जा, असा सल्लाही हाळीकर यांनी कंत्राटदाराला दिला आहे. याचा एक व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. या प्रकाराने आता खळबळ उडाली असून अभियंत्याविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
जानेवारी अखेरला सेवानिवृत्त
हाळीकर हे जानेवारी अखेरला सेवानिवृत्त होत आहेत. परंतु या व्हिडिओमुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. आतापर्यंत पण त्यांनी पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत, परंतु वरिष्ठांनी त्यांच्यावर कसलीच कारवाई केली नाही. त्यामुळेच त्यांचे दिवसेंदिवस मनोबल वाढत गेल्याचे सांगण्यात आले.
सीईओ पवार यांच्याविरोधातही तक्रार
हाळीकर यांनी पैसे घेतल्याची तक्रार व्हिडिओसहीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात अशोक काळकुटे यांनी केली होती. परंतु त्यांनीही यावर कसलीच चौकशी केली नाही. तसेच संपर्क साधल्यावरही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हाळीकर यांना पवार यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा आरोप केला जात आहे. आता हाळीकर यांच्यासह पवार यांच्याविरोधातही जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्यात आली आहे. पवार यांना संपर्क साधला, परंतु नेहमीप्रमाणे त्यांनी गुरुवारीही फोन घेतला नाही.
असे काही असेल तर मला माहिती नाही. मी पैसे घेतल्याचे आठवत नाही.
- पुरूषोत्तम हाळीकर, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग बीड