कोरोनात वापरलेल्या वाहनांचे थकले ७२ लाखांचे बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:39 AM2021-09-14T04:39:11+5:302021-09-14T04:39:11+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात भाड्याने घेतलेल्या खाजगी वाहनांचे भाडे आणि पेट्रोल पंपावर भरलेल्या इंधनाचे तब्बल ७२ लाख ७९ हजार ...
बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात भाड्याने घेतलेल्या खाजगी वाहनांचे भाडे आणि पेट्रोल पंपावर भरलेल्या इंधनाचे तब्बल ७२ लाख ७९ हजार रुपये प्रशासनाकडे थकले आहेत. बिलासाठी वाहनधारक मागील पाच महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालय व आरटीओ कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु यावर कसलीच कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना ने-आण करण्यासाठी शासकीय वाहनांची कमतरता पडत होती. त्यामुळे भाडेतत्त्वावर ६६ वाहने घेण्यात आली होती. या वाहनांत इंधन भरण्याची जबाबदारीही शासनाचीच होती. परंतु भाड्याचे पैसे २० मार्च २०२१ पर्यंत देण्यात आलेले आहेत. त्यानंतरच्या पाच महिन्यांचे ३७ लाख ७९ हजार रुपये अद्यापही दिलेले नाहीत. तसेच २० ऑक्टोबर २०२० पासून बीड शहरातील पोलीस पेट्रोल पंपावर इंधन भरले होते. त्यांचेही तब्बल ४० लाख रुपये देणे बाकी आहेत. आरोग्य विभागाकडून आरटीओ व जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पत्राद्वारे निधीची मागणी करण्यात आली. परंतु त्यांच्याकडून केवळ टोलवाटोलवी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. इकडे वाहनधारक अडचणीत सापडले असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत आरडीसी मच्छिंद्र सुकटे यांना विचारल्यावर त्यांनी या बिलांचे मला काही माहिती नाही. याची सर्व माहिती दुसऱ्या विभागाचे आघाव यांच्याकडे आहे, असे म्हणत त्यांना विचारून घेण्याचा सल्ला दिला. तर प्रकाश आघाव यांना संपर्क केल्यावर त्यांनी फाेन घेतला नाही.
---
वाहनांचे बिल देण्याबाबत आम्ही मागणी करीतच आहोत. हा थोडा गाेंधळ आहे. लवकरच ही सर्व बिले देण्याबाबत कार्यवाही केली जाईल.
- डॉ. रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
---
अशी वापरली वाहने
जिल्ह्यात सर्वांत जास्त २४ वाहने बीड तालुक्यात वापरली. त्यानंतर गेवराई २, आष्टी ५, पाटोदा ४, शिरूर २, केज ५, अंबाजोगाई ८, परळी ७, धारूर ४, वडवणी २, माजलगाव ३ अशी ६६ वाहने वापरण्यात आली.
---
वाहनांच्या भाड्याचे बिल - ३७ लाख ७९ हजार
इंधनाचे बिल - ३५ लाख