बीड, अंबाजोगाईत परिचारिकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:16 AM2019-08-28T00:16:25+5:302019-08-28T00:17:03+5:30

परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यासांठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने लढा उभारला आहे. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले

Exhibition of hostesses in Beed, Ambajogai | बीड, अंबाजोगाईत परिचारिकांची निदर्शने

बीड, अंबाजोगाईत परिचारिकांची निदर्शने

Next
ठळक मुद्देहक्कासाठी लढा : बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना तर अंबाजोगाईत अधिष्ठातांना निवेदन

बीड : परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यासांठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने लढा उभारला आहे. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले तर अंबाजोगाईत राज्य परिचारिका सेवा संघाने आंदोलन करून अधिष्ठातांना मागण्यांचे निवेदन दिले. न्याय मिळेपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचा इशारा पारिचारिकांनी दिला.
बंधपत्रातील परिचारिकांना सरळसेवेत सामावून घ्यावे, सहाव्या वेतन आयोगाच्या त्रुटी दूर करून सर्व भत्यासह सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, बदली धोरणातून परिचारिका सर्वांना वगळावे आणि विनंतीशिवाय बदली करू नये, आदी मागण्यांचे निवेदन बीडमध्ये निवासी उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या बीड अध्यक्षा संगीता सिरसाट, विद्या कुलकर्णी, सुनीता वाईकर, रजनी वैद्य, संगीता क्षीरसागर, संध्या धुरंदरे, साधना कुडके, स्वाती गव्हाणे उपस्थित होत्या.
आपल्या मागण्या शासनदरबारी पोहोचविल्या जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. यावेळी परिचारिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अंबाजोगाईत प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
अंबाजोगाई येथे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य परिचारिका सेवा संघ, अंबाजोगाईने आंदोलन केले.
वारंवार निवेदने देऊन, आंदोलने करूनही शासन स्तरावरून काहीच उपाययोजना न केल्याने परिचारिकांमध्ये असंतोष आहे. हाच धागा पकडून मंगळवारी आंदोलन केले.
अधिष्ठातांना आपल्या मागण्यांचे निवेदन संघटनेने दिले. यावेळी वर्षा सौताडेकर, मंगेश सुरवसे, चित्रलेखा मिसाळ-बांगर, झालू राठोड, सुनीता सिरसाट-घुले आदींसह परिचारिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

Web Title: Exhibition of hostesses in Beed, Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.