दत्तवाडीच्या ग्रामस्थांचा वनवास संपेना; पुलाअभावी २५ कि.मी.चा हेलफाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:34 AM2021-07-30T04:34:41+5:302021-07-30T04:34:41+5:30
परळी : तालुक्यातील दत्तवाडी (वनवासवाडी) गावच्या आंधारेश्वर मंदिराजवळील तळ्यामध्ये मंजूर झालेल्या नवीन पुलाचे काम सध्या अर्धवट असल्याने या ...
परळी : तालुक्यातील दत्तवाडी (वनवासवाडी) गावच्या आंधारेश्वर मंदिराजवळील तळ्यामध्ये मंजूर झालेल्या नवीन पुलाचे काम सध्या अर्धवट असल्याने या गावातील लोकांचा जवळील अंतरावरून परळीशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याप्रश्नी परळीच्या उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांची ग्रामस्थांनी बुधवारी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
परळीपासून ९ किलोमीटर अंतरावर ५०० लोखसंख्येचे दत्तवाडी हे गाव असून, ते मालेवाडी ग्रामपंचायतअंतर्गत येते. या गावाला चांदापूर फाट्यावरून मालेवाडी, दत्तवाडी, हेळंब, दौंडवाडी, सेवा नगर तांडा ही गावे पुलाच्या रस्त्याशी जोडली गेली आहेत. याच रस्त्यावर दत्तवाडी गावच्या जवळ अंधारेश्वर मंदिराजवळ तळ्यामध्ये जुना मोऱ्यांचा पूल होता. त्याच पुलावर नवीन पूल मंजूर झाला आहे. त्याचे काम तळ्याचे पाणी कमी झाल्याशिवाय करता येत नाही. दहा दिवसांपासून येथील तळ्यातील पाण्यात वाढ झाली आहे. मे महिन्यामध्ये संबंधित एजन्सीला काम मिळाले. वेळीच काम झाले सुरू केले असते तर हे काम पूर्ण झाले असते. काम करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ होता. संथ गतीने झाल्याने सध्या तलावातील पाण्यामुळे पुलाचे काम बंद आहे. बुधवारी ग्रामस्थांनी तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पर्यायी रस्ता करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी पाटलोबा गीते, केशव गीते, प्रसराम गीते, माणिक गीते, महादेव गुट्टे, बाबुराव गीते, भास्कर गीते, लिंबाजी बदने, राम कसबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पर्यायी मार्ग लांबचा
पुलाअभावी मौजे दत्तवाडी गावातील लोकांना परळीशी संपर्क करता येत नाही. हे अंतर नऊ किलोमीटर आहे. हेळंबमार्गे परळीला यावे लागत आहे. गावची मुख्य बाजारपेठ परळी आहे. या गावात ५०० लोकसंख्या आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय दूध, भाजीपाला विकणे हा आहे. या कामासाठी परळीला सध्या २५ कि. मी. अंतरावरून सारडगावमार्गे हेलफाटा मारून यावे लागत आहे, तर दौंडवाडी दत्तवाडीमार्गे परळी बारा किलोमीटर आहे, तर आता दौंडवाडी घाटनांदूरमार्गे २० किलोमीटर अंतर कापून यावे लागत आहे.
----------
तलावातील पुलाचे काम वेळेत न झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. शासनाने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून द्यावी - पाटलोबा गीते.
----------
मौजे दत्तवाडी येथील ग्रामस्थांना परळीला येण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, असे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला सूचित केले आहे. - सुरेश शेजूळ, तहसीलदार, परळी
--------
290721\29bed_1_29072021_14.jpg