चव्हाण यांची हकालपट्टी करा, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करणार हे आधी सांगा; आ. मेटे यांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 01:31 PM2021-05-07T13:31:00+5:302021-05-07T13:33:18+5:30
Maratha Reservation : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा विषय कधीच गांभीर्याने घेतला नाही. सतत दुर्लक्ष केले
बीड : सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजावर आकाश कोसळले आहे. यामुळे मराठा समाजाच्या मुला-मुलींचे भविष्य अंधकारमय झाले आहे. हे राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाले असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशोकराव चव्हाण यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखविण्यापेक्षा मराठा समाजासाठी स्वतः काय करणार हे स्पष्ट करावे, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते आ. विनायक मेटे यांनी केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा विषय कधीच गांभीर्याने घेतला नाही. सतत दुर्लक्ष केले,त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द झाले असा आरोप आ. विनायक मेटे यांनी केला. यामुळेच मराठा समाजावर राज्य सरकारने केलेल्या अन्यायाच्या विरोधात आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करू नये. तर मराठा समाजाला न्याय कसा देणार, आरक्षण कसे देणार,कोणत्या सोयीसवलती देणार हे आधी सांगावे अशी मागणी आ. मेटे यांनी केली आहे. तसेच अशोकराव चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजावर ही वेळ आली असल्याने त्यांची त्वरित मंत्रिमंडळातून हकालपट्टी कारवाई अशीही मागणी आ. मेटे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊननंतर बीडमध्ये पहिला मोर्चा निघणार
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर गुरुवारी आमदार मेटे यांनी मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी, राज्य सरकाच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकले नाही. या निर्णयाचा मोठा परिणाम मराठा समाजातील पुढील पिढीवर होणार आहे. त्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. त्यामुळे आता शांत बसणे परवडणार नाही. त्यामुळे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन २०१६ सालाप्रमाणे मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे. १५ तारखेला लॉकडाऊन संपले तर पुढील काही दिवसांत पहिला मोर्चा बीडमध्ये काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले.