मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 05:35 PM2024-05-14T17:35:58+5:302024-05-14T17:44:31+5:30

मराठा आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये प्रचारसभा घेण्याचं टाळलं, अशी चर्चा होती.

Explanation of Devendra Fadnavis regarding not holding campaign meeting in Beed constituency in Lok Sabha elections | मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर

मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर

Devendra Fadnavis ( Marathi News ) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे मैदानात होते. या अटीतटीच्या लढतीत कोण विजयी होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. बीडमधील निवडणुकीवर मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. तसंच मराठा आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये प्रचारसभा घेण्याचं टाळलं, असंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वत: फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

"मी मराठवाड्यातील ८ पैकी ७ मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या आहेत. फक्त मी बीड लोकसभा मतदारसंघात जाऊ शकलो नाही. मला बीडला जायचं होतं, मात्र त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा लागल्या. यातील एका सभेला मी गेल्यामुळे बीडमध्ये जाता आलं नाही. मराठवाड्यातील बीड वगळता इतर एका-एका मतदारसंघात मी ३ ते ४ सभा घेतल्या आहेत," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी हे भाष्य केलं आहे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जातीय ध्रुवीकरण पाहायला मिळालं. हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या सोशल फॅब्रिकला धक्का देणारं हे ध्रुवीकरण आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. अशा प्रकारची दुफळी निर्माण होणं, समाज एकमेकांसमोर येणं हे चांगलं नाही. अर्थात हे सर्वदूर झालं नसलं तरी तीन-चार मतदारसंघांमध्ये हे चित्र पाहायला मिळालं. मात्र ते योग्य नाही," अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.

बीडमध्ये कसं होतं राजकीय चित्र?

बीड लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत आहे. वंचितचा उमेदवार रिंगणात असला तरी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासमोर खरे आव्हान हे मविआतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचेच आहे.  

बीड मतदारसंघातून भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे सलग दोन वेळा खासदार झाल्या. त्या हॅटट्रिक साधणार, असं वाटत असतानाच पक्षाने त्यांचे तिकीट कापून पंकजा यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात बजरंग सोनवणे आणि वंचितचे अशोक हिंगे हे निवडणूक रिंगणात आहेत. २०१९ रोजी पराभूत झालेले बजरंग सोनवणे यांना सलग दुसऱ्यांदा पवार यांनी उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे ओबीसी, सोनवणे मराठा आणि हिंगे कुणबी मराठा आहेत.  

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी २०२४ ला अर्ज भरायला येताना रेल्वेतूनच येणार, असे ठणकाहून सांगितले होते. परंतु अद्यापही रेल्वे बीडपर्यंत आली नाही. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले गेल्याचं पाहायला मिळालं. मात्र जातीचा मुद्दाच निवडणूक प्रचारात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.  
 

Web Title: Explanation of Devendra Fadnavis regarding not holding campaign meeting in Beed constituency in Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.