पावडर कोटिंगच्या कारखान्यातील स्फोटाने बीड हादरले; एकाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 04:25 PM2020-08-26T16:25:34+5:302020-08-26T16:28:02+5:30
संतोष व त्यांचे बंधू जगदीश यांनी तीन वर्षांआधी अॅनोडाझींग व पाडर कोंटींगचा व्यवसाय सुरू केला होता.
बीड : पांगरी रोडवर असणाऱ्या गिरामनगर भागातील अॅनोडायझिंग आणि पावडर कोटिंग कारखान्यात भट्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेसर व गॅसचा मंगळवारी दुपारी दोन वाजता स्फोट झाला. या स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला. तिघे गंभीर जखमी झाले. संतोष दामोदर गिराम (३२, रा. गिरामनगर, पांगरी रोड) असे स्फोटातील मयताचे नाव आहे. त्यांचे बंधू जगदीश दामोदर गिराम, अनिल गांडुळे व एक परप्रांतीय मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
संतोष व त्यांचे बंधू जगदीश यांनी तीन वर्षांआधी अॅनोडाझींग व पाडर कोंटींगचा व्यवसाय सुरू केला होता. त्याठिकाणी खिडक्या, दरवाजे व अॅल्युमिनियमचे साहित्य तयार केले जाते. सोमवारी दुपारी कारखाना मालक संतोष गिराम, त्यांचे बंधू जगदीश गिराम, अनकेत गांडुळे व एक परप्रांतीय कामगार, असे चौघे जण तेथे काम करत होते.अॅल्युमिनियमला रंग देण्यासाठी असलेल्या भट्टीत काम सुरू असताना अचानक हवेचा उच्चदाब असलेले कॉम्प्रेसर फुटून मोठा स्फोट झाला. या उच्चदाबाच्या हवेमुळे कारखान्यातील सगळेच जण उडून बाजूला पडले. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसर हादरून गेला होता. आवाज झाल्याने शेजारी हॉटेलमध्ये व फरशीच्या कारखान्यात असलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
गंभीर जखमी झालेल्यांना उपचारासाठी तात्काळ एका खाजगी दवाखान्यात नेले. यावेळी डॉक्टरांनी तपासून यातील संतोष गिराम यांना मृत घोषित केले. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपाधीक्षक भास्कर सावंत, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील बिर्ला, उपनिरीक्षक गणेश गोडसे यांनी भेट दिली. दरम्यान संतोष गिराम यांचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.
नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर
संतोष गिराम व जगदीश गिराम यांनी मोठ्या कष्टाने अॅनोडायझिंग व पावडर कोटिंग कारखाना सुरू केला होता. जेमतेम बेताची परिस्थिती असतानाही त्यांनी हा व्यवसाय वाढवला होता. मात्र, स्फोटात संतोष गिराम यांना आपला जीव गमवावा लागला.
कारखान्याचे मोठे नुकसान
कारखान्यात पावडर कोटिंगच्या कामासाठी गॅसचादेखील वापर केला जातो. मात्र, त्याची वेगळी रांग केलेली असल्यामुळे या स्फोटाचा परिणाम त्यावर झाला नाही. त्यामुळे अनर्थ टळला. उच्चदाब हवा असलेले कॉम्प्रेसर फुटल्याने कारखान्याचे लोखंडी अँगल वाकले असून, मोठे नुकसान झाले आहे.