बीड आरोग्य विभागाच्या अपयशाचा पर्दाफाश; दोन दिवसांत लपविलेल्या ८५ कोरोना बळींची पोर्टलवर नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:33 AM2021-05-13T04:33:57+5:302021-05-13T04:33:57+5:30
लोकमत इम्पॅक्ट बीड : जिल्ह्यात उपचारांतील दुर्लक्ष व अपुऱ्या सुविधांमुळे एप्रिल महिन्यात स्मशानात मृतदेहांची रांग लागली; परंतु आरोग्य विभागाने ...
लोकमत इम्पॅक्ट
बीड : जिल्ह्यात उपचारांतील दुर्लक्ष व अपुऱ्या सुविधांमुळे एप्रिल महिन्यात स्मशानात मृतदेहांची रांग लागली; परंतु आरोग्य विभागाने याची नोंदच केली नसल्याचे 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणताच यंत्रणा कामाला लागली. यात मागील दोन दिवसांत तब्बल जुन्या ८५ मृत्यूंची नोंद आयसीएमआर पोर्टलवर झाली आहे. यात सर्वाधिक मृत्यू हे अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील आहेत. हा आकडा आणखी वाढणार असून, आरोग्य विभागाच्या अपयशाचा 'लोकमत'ने पर्दाफाश केला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यासह मृत्यूही होत आहेत. कराेडो रुपयांचा निधी उधळूनही उपचारांतील हलगर्जीपणा आणि अपुऱ्या सुविधांमुळे हे मृत्यू होत असल्याच्या तक्रारी होत्या. परंतु हे मृत्यू आरोग्य विभाग लपवीत होता. केवळ एप्रिल महिन्यात अंबाजोगाई आणि बीडमधील स्मशानात ३७८ बाधितांवर अंत्यसंस्कार केले होते; तर आरोग्य विभागाकडे २७३ मृत्यूंची नोंद होती. यात १०५ कोरोनाबळींची तफावत होती. हाच प्रकार 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणला. त्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली. दोन दिवसांत तब्बल ८५ जुन्या मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास ७० पेक्षा जास्त मृत्यू हे एकट्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील आहेत. या लपविलेल्या मृत्युसंख्येमुळे आरोग्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून, हा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
‘स्वाराती’चे अधिष्ठाता देईनात उत्तर
अंबजाेगाईच्या स्वाराती रुग्णालयानेच जास्त मृत्यू लपविलेले आहेत. याबाबत अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे यांना चार वेळा संपर्क केला. तसेच संदेशही पाठविला; परंतु त्यांनी भ्रमणध्वनी बंद केला. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आर. बी. पवार हे बैठकीत होते.
खासगी रुग्णालयांनीही लपविले बळी
सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांनीही कोरोनाबळी लपविले आहेत. यात बीडमधील सूर्या हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल आणि दीप हॉस्पिटलचा समावेश आहे. तसेच माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलने तीन मृत्यू लपविले होते. त्याची नोंद या दोन दिवसांत झाली आहे.
चौकशी अहवालाची प्रतीक्षा
...
'लोकमत'ची बातमी वाचून मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले आहे. आरोग्य विभाग स्वत:चे अपयश झाकण्यासाठी कोरोनाबळी लपवीत असल्याची बाब अतिशय धक्कादायक आहे. आता यावर तात्काळ कारवाई करावी.
नमिता मुंदडा, आमदार.
...
दोन दिवसांत नोंदविलेले मृत्यू
केवळ एप्रिल महिन्यात झालेले मृत्यू - ८५
२०२० मध्ये झालेले मृत्यू - २२
खासगी रुग्णालयातील मृत्यू - ६.
===Photopath===
120521\12_2_bed_12_12052021_14.jpg
===Caption===
लोकमतने ९ मे रोजी कोरोनाबळी लपविल्याचा प्रकार उघडकीस आणला होता.